Pune : कांदा बराखीत अज्ञाताने युरिया टाकल्याने ५०० पिशवी कांदा सडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

onions

Pune : कांदा बराखीत अज्ञाताने युरिया टाकल्याने ५०० पिशवी कांदा सडला

निरगुडसर : शिंगवे आंबेगाव येथील शिवाजी मुकिंदा टाके यांनी साठवलेल्या कांदा बराखीत अज्ञाताने युरिया टाकल्याने जवळपास ५०० पिशवी कांदा सडला असल्याने मोठे नुकसान केले आहे. ही घटना गुरुवार(ता .२९ ) रोजी उघडकीस आली.शिंगवे गावठाणानजीक दिलीप गोरडे यांच्या शेतामध्ये बांधलेल्या बराकीत तीन शेतकर्‍यांनी जवळपास १५०० पिशवी कांदा साठवला आहे. त्यामध्ये शिवाजी मुकींदा टाके यांच्या पाचशे कांदा गोणी साठवल्या होत्या.त्यामध्ये शिवाजी टाके यांच्याच साठवलेल्या कांद्यावर अज्ञाताने युरिया टाकल्याने शिवाजी टाके यांच्याच कांद्याचे सडून मोठे नुकसान झाले त्यामध्ये बराखीतील पाचशे गोणी कांदा सडून गेला असून सध्या पाणी गळत आहे.

पंधरा दिवसापूर्वी टाके यांनी बराखीतील कांद्याची पहाणी केली असता त्यावेळेस कांदा सुस्थितीत होता. त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर कांदा बाजारपेठेत पाठवायचे ठरवले होते. परंतू बराखीतील कांदा सडल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी लगेचच कांदा पिशव्यांमध्ये भरून बाजारपेठेत पाठवायला सुरुवात केली परंतु बारकाईने पाहणी केली असता संपूर्ण कांदा सडून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले तसेच कांदा बराखीत युरिया टाकल्याचे आढळून आले आहे.

टाके यांनी कांदा पिकासाठी मोठे भांडवल उभे केले होते. त्यानंतर सुरुवातीपासून कांदा बराखीत टाकण्यापर्यंत मजुरीचा एक लाख रुपये खर्च झाला आहे. बाजारभाव वाढीच्या आशेने कांदा बराखीतच साठवला होता. आता कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली होती परंतु समाजकंटकाने बराखीत युरिया टाकून शिवाजी टाके या शेतकर्‍याचे नुकसान केले.