Palkhi Sohala : वारीच्या वाटचालीत हवामानाचा अंदाज चोवीस तास अगोदर कळणार

आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या भेटीची आस प्रत्येक भक्ताला लागते. त्यासाठी आळंदी व देहू येथून अनुक्रमे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे प्रस्थान ठेवतात.
Weather
Weatheresakal

पुणे - आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या भेटीची आस प्रत्येक भक्ताला लागते. त्यासाठी आळंदी व देहू येथून अनुक्रमे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे प्रस्थान ठेवतात. पायी वारीच्या या वाटचालीच्या काळात वारकऱ्यांच्या सोईसाठी हवामानशास्त्र विभाग हवामानाचा अंदाज वर्तविणार आहे. त्यासाठी त्यांच्या संकेतस्थळावर स्वतंत्र ‘वेब-पेज’ तयार केले आहे. त्यामुळे वारीच्या मार्गावरील हवामानाचा अंदाज आता चोवीस तास अगोदर कळणार आहे. तसेच, दिवसभरात कोणत्या वेळेत पाऊस पडेल, याचा अंदाज तीन तास अगोदर वर्तविणार आहेत.

देहू व आळंदी येथून पंढरपूरचे अंतर साधारण अडीचशे किलोमीटर आहे. यंदा अधिक महिना असल्यामुळे दहा-बारा दिवस अगोदर अर्थात १० व ११ जून रोजी वारीला प्रारंभ होणार आहे. शिवाय, नेहमी सात जूनला महाराष्ट्रात प्रवेश करणारा पाऊस यंदा लांबला आहे, पण तो लवकरच राज्यात दाखल होईल, असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. मात्र, पाऊस सक्रिय होईपर्यंत वारीची अर्धी वाट पूर्ण होण्याची शक्यता आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाचा पारा ३५ ते ४२ अंश दरम्यान राहिला आहे.

पुणे हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख कृष्णानंद ओसळीकर म्हणाले, ‘मागील वर्षांपासून आषाढी वारीच्या सुमारे अठरा ते वीस दिवसांत हवामानाचे स्वतंत्र मॉडेल आम्ही विकसित केले आहे. वारीच्या मार्गावरील हवामानाचा अंदाज २४ तास अगोदर देण्यात येतो. मागील वर्षी या मॉडेलला यश आले. यंदा त्यात अधिकाधिक अद्ययावत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

वारीच्या प्रारंभापासून अर्थात १० जूनपासून ही यंत्रणा कार्यान्वित असेल. यंदा हवामानाचा अंदाज पाहता गेल्या दोन महिन्यांपासून असलेले उन्हाचे प्रमाण वारीच्या वाटेने जाणवेल असेही नाही. त्याचे प्रमाण कमी असेल. त्यातून मॉन्सूनची वाटचाल येत्या आठवड्यात वेगाने झाल्यास मॉन्सून लवकर सक्रिय होऊन ढगाळ वातावरण तसेच दुपारनंतर पाऊस सुरू होऊ शकतो.’’

‘सकाळ’ घेणार पुढाकार

पुण्यातील हवामानशास्त्र विभागाद्वारे देण्यात येणारा अंदाज ‘सकाळ’कडून तो संकलित करून संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आणि अन्य पालखी सोहळ्यांना देण्यात येईल. तसेच चोवीस तास अगोदरचा अंदाज ‘सकाळ’मध्ये ‘आषाढी वारीतील हवामान’ अशा आशयाने स्वतंत्रपणे प्रकाशित करण्यात येईल. तसेच पावसाच्या तीन तास अगोदरचा अंदाज संबंधित संस्थांना दिला जाईल. ‘सकाळ’च्या सर्व सोशल मीडियाद्वारे प्रसारित करण्यात येईल.

Weather
Motivation : दृष्टिहीन असूनही जिद्द व चिकाटीच्या जोरावर गणेशची यशाला गवसणी

वारीत लाखो वारकरी सहभागी होतात. अठरा ते वीस दिवसांची वाटचाल असते. त्या मार्गावरील हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. त्यावरील माहिती वारकऱ्यांमध्ये अधिकाधिक पोचविल्यास नियोजन करणे त्यांना सोयीचे होईल. हवामानाची माहिती वारकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी देवस्थानांनी पुढाकार घ्यावा.

- कृष्णानंद ओसळीकर, प्रमुख, पुणे हवामान विभाग

पुणे वेधशाळा हवामानाचा अंदाज व्यक्त करून चांगला उपक्रम रावबित आहे. वारकरी व संबंधित यंत्रणा राबविणाऱ्यांसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. त्यांच्याकडून आलेली माहिती आवश्यक त्या वेळी समाज आरतीत देण्याची व्यवस्था केली जाईल. तसेच संस्थानच्या संकेतस्थळावर माहिती टाकून दिंड्यांना कळविण्याचाही प्रयत्न करण्यात येईल.’’

- ॲड. विकास ढगे, सोहळाप्रमुख, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान

Weather
Palkhi Sohala : पालखी सोहळा मार्गावर शंभर मीटरपर्यंत वाहने उभी करण्यास प्रतिबंध

पुणे हवामान विभाग वारकऱ्यांसाठी करीत असलेले संशोधन स्तुत्य आहे. त्याचा वारकऱ्यांना अधिकाधिक उपयोग होईल. पालखी मार्गावर पावसाची पूर्वसूचना मिळाली तर वारकऱ्यांसाठी सजग राहता येईल. वारकऱ्यांची वाढती गर्दी पाहता अशा प्रकारे हवामानाबद्दलची अद्ययावत माहिती मिळणे गरजेचे आहे. त्यांची माहिती वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

- संजय महाराज मोरे, सोहळाप्रमुख, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com