esakal | Pune: वाहनतळ ठेकेदारांवर आता कारवाईचा बडगा!
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

पुणे : वाहनतळ ठेकेदारांवर आता कारवाईचा बडगा!

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : ठेकेदारांकडून वाहनतळांची थकबाकी भरण्यास टाळाटाळ सुरू असल्याने व मिळकतींचे पत्ते चुकीचे दिल्याने जप्तीची कारवाई करता आलेली नाही, त्यामुळे आता या ठेकेदारांविरोधात न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे. तसेच, चुकीचे पत्ते दिल्याने फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पुणे महापालिकेचे शहरात ३० वाहनतळ असून, या प्रत्येक वाहनतळाची स्वतंत्र निविदा काढून त्याद्वारे संचलन केले होते. मात्र, सध्या ३० पैकी २७ वाहनतळांच्या ठेक्याची मुदत संपलेली आहे. यातील काही ठेकेदारांना दरवर्षी मुदतवाढ देऊन त्यांच्याकडून वाहनांचे पैसे घेतले जात आहेत, तर तीन ठिकाणी ठेकेदारांची मुदत अद्याप संपलेली नाही. ३० पैकी १६ ठेकेदारांकडे गेल्या काही वर्षांपासूनची थकबाकी आहे. कोरोनामध्ये वाहनतळ बंद असल्याने या काळासाठी भाडे माफ करावे, अशी मागणी ठेकेदार करीत आहेत. मात्र, महापालिकेला मिळकतींचे खोटे पत्ते देऊन दिशाभूल केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. आगामी काळात वाहनतळांचे व्यवस्थापन ३० ऐवजी केवळ पाच ठेकेदारांच्या माध्यमातून केले जाणार आहे.

हेही वाचा: धुळे : 'तो' मृत्यूदेह विधवा तरूणीचा, प्रेम संबंधातून खून

त्यामुळे त्यांना शिस्त लागेल, असा दावा केला आहे. पण, प्रशासनाचा वचक ठेवण्यासाठी कायदेशीर कारवाईसाठी पाऊल उचलले आहे. १६ ठेकेदारांच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यात येणार असून, हा प्रस्ताव सध्या आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठविलेला आहे. न्यायालयात दावा दाखल करण्यासाठी महापालिकेला मुद्रांक शुल्क भरावे लागते, यासाठीच या खर्चाची मंजुरी स्थायी समितीकडून घेणे आवश्यक आहे. आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव स्थायी समितीला सादर केला जाईल. यावेळी ठेकेदारांवर कारवाई करण्याबाबत स्थायी समिती काय निर्णय घेणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी

१६ थकबाकीदार ठेकेदारांपैकी १४ जणांनी चुकीचे पत्ते देऊन महापालिकेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे महापालिकेला जप्तीची कारवाई करता आली नाही. करार करताना मिळकतींची प्रत्यक्षात पाहणी केली नसल्याने हा प्रकार घडला आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार म्हणाले, ‘‘संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांचीही चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल.’’

हेही वाचा: मंचर : जादू दाखवितो सांगून मोबाईलच पळविला

‘सकाळ’ने समोर आणली अनागोंदी

‘सकाळ’ने पाच भागांच्या मालिकेतून वाहनतळाच्या कामकाजातील अनागोंदी समोर आणल्याने ठेकेदारांवरची आणि त्यांच्या आश्रयदात्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आतापर्यंत झालेल्या चुका टाळून भविष्यात नियमात सुधारणा केली जाते आहे. त्यामुळे भविष्यातील घडामोडी, निविदा प्रक्रिया, करारनामा याकडेही ‘सकाळ’चे लक्ष असेल.

वाहनतळाच्या थकबाकी वसुलीसाठी ठेकेदारांवर न्यायालयात खटले दाखल केले जाणार आहेत. यासाठीचा प्रस्ताव आयुक्तांच्या मान्यतेसाठी पाठविला आहे. त्यानंतर स्थायी समितीच्या मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. खोटे पत्ते देणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

- डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

३०

एकूण वाहनतळ

५४६०

वाहने लावण्याची एकूण क्षमता

१६

थकबाकीदार ठेकेदार

५.३९ कोटी

एकूण थकबाकी

loading image
go to top