
पुणे - पुण्यात कोरोनाचा आणखी उद्रेक होण्याची भीती असतानाच महापालिकेकडे सध्या फक्त ६२ रुग्णवाहिका आहेत. महापालिकेला ५३ रुग्णवाहिकांची सेवा पुरविणाऱ्या एका स्वयंसेवी संघटनेने सध्या महापालिकेकडून निधीअभावी मोबदला मिळत नसल्याने सेवा देणे थांबविले आहे. त्यामुळे रुग्णवाहिका उपलब्ध होण्यात येणाऱ्या अडचणी वाढल्या आहेत.
शहरात कोरोनाचे रोज साधारपणे अडीचशे ते तीनशे नवे रुग्ण सापडत आहेत. त्यात ज्येष्ठ नागरिक आणि अन्य गंभीर आजार असलेले रुग्ण आहेत. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचा ‘स्वॅब’ घेण्याच्या प्रक्रियेपासून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज असते. मृतदेह अत्यंसंस्करासाठी नेण्याकरीताही रुग्णवाहिकेची मागणी असते. गेल्या दोन महिन्यांपासून महापालिका आणि राज्य सरकारच्या मिळून ६२ आणि भारतीय जैन संघटनेच्या ५३ अशा एकूण ११५ रुग्णवाहिका रस्त्यांवर होत्या. यातील संघटनेच्या रुग्णवाहिकेचा खर्च हा सामाजिक उत्तरदायित्व निधी ( सीएसआर) अंतर्गंत केला जातो. मात्र तो निधी आता उबलब्ध नसल्याने या रुग्णवाहिकांची सेवा स्वयंसेवी संघटनेने थांबविली आहे. त्याचवेळी तासनतास फोन करूनही सरकारच्या रुग्णवाहिका मिळत नसल्याचा रुग्णांचा नव्हे तर महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे.
शहरातील स्थिती लक्षात घेऊन भारतीय जैन संघटनेने आपल्याकडील बहुतांशी रुग्णवाहिका महापालिकेला दिल्या. त्याचा मोबदला हा ‘सीएसआर’मधून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून संघटनेची आरोग्य खात्याला मोठी मदत झाली. त्यामुळे ताण जाणवला नाही. परंतु, अचानक ५३ रुग्णवाहिका नसल्याने मोठा ताण आला असून, रात्री-अपरात्री रुग्णांना सेवा पुरविण्यात अडचणी येत आहेत, अशा तक्रारी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या आहेत. तर, रुग्णवाहिका निर्जतुकीकरण करण्यात वेळ जात असल्याने सर्वच ठिकाणी सेवा पुरविणे शक्य नसल्याचे उत्तर राज्य सरकारच्या रुग्णवाहिका व्यवस्थापनाकडून दिले जात आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
भारतीय जैन संघटनेसह अन्य काही संस्थांच्या रुग्णवाहिकांचा ताफा उतरविण्याकरिता महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी धडपड केली; मात्र लगेचच त्या उपलब्ध होण्याची शक्यता नसल्याचे दिसून आले.
नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार रुग्णवाहिका पुरविण्यासाठी ऑक्सिजनची सुविधा असलेल्या १५ रुग्णवाहिका महापालिका घेण्याचे नियोजन होते. त्यातील पाच रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊ.
- मुरलीधर मोहोळ, महापौर
राज्य सरकार आणि महापालिकेच्या रुग्णवाहिका सध्या सेवेत आहेत. आणखी किमान ५० रुग्णवाहिकांची आवश्यकता आहे. त्या उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. पुरेशा रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या की २४ तास सेवा पुरविता येईल.
- डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका
पुण्यातील रुग्णवाहिका
१२ - महापालिकेच्या
५० - राज्य सरकार (१०८)
५३ (सध्या सेवेत नाहीत) भारतीय जैन संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.