PDCC Bank Recruitment : नियमांच्या कात्रीत अडकली पुणे जिल्हा बॅंकेची नोकरभरती! ३२ हजार ३२० जण प्रतिक्षेत pune PDCC Bank Recruitment trap in rules | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune district bank

PDCC Bank Recruitment : नियमांच्या कात्रीत अडकली पुणे जिल्हा बॅंकेची नोकरभरती! ३२ हजार ३२० जण प्रतिक्षेत

पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची (पीडीसीसी) लेखनिक (लिपिक) पदाची भरती मागील दोन वर्षांपासून सरकारी नियमांच्या कात्रीत अडकून पडली आहे. लेखनिक पदाच्या एकूण ३५६ रिक्त जागा भरण्यासाठी ही नोकरभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. परंतु उमेदवारी अर्ज दाखल करून घेतल्यापासून आतापर्यंत ही भरती प्रक्रिया जैसे थे स्थितीत अडकून पडली आहे. यासाठी सरकारी नियमांचा अडसर निर्माण झाला आहे. त्यामुळे या रिक्त जागांसाठी अर्ज केलेल्या पुणे शहर व जिल्ह्यातील ३२ हजार ३२० उमेदवारांचे डोळे या भरती प्रक्रियेकडे लागले आहेत.

सहकारी बॅंकांना नोकरभरती करण्यासाठी सहकार विभागाची परवानगी घ्यावी लागते. यानुसार पुणे जिल्हा बँकेतील लेखनिक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी सहकार विभागाने २०२० मध्येच जिल्हा बँकेला रीतसर परवानगी दिली होती. या परवानगीनंतर जिल्हा बॅंकेने २०२१ मध्ये ही भरती प्रक्रिया सुरु केली होती. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.

या भरतीसाठी अमरावती येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. या संस्थेने इच्छुकांकडून परीक्षा शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरून घेतलेले आहेत. त्यानंतर मात्र त्यापुढची सर्व प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आलेली असल्याचे यासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

अशी आहे स्थिती

  • या भरतीला पहिल्यांदा जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूक आचारसंहितेचा तर, त्यानंतर सरकारी नियमांच्या कात्रीचा मोठा अडसर निर्माण झाला.

  • या तांत्रिक अडचणीमुळे उमेदवारी अर्ज दाखल करून दोन वर्षांचा कालावधी लोटून गेला आहे. त्यामुळे आता ही पूर्वीची भरती प्रक्रिया राबवावी की, नाही? या संभ्रमात जिल्हा बॅंकेचे नवीन संचालक मंडळ पडले होते.

  • हा संभ्रम दूर करण्यासाठी सहकार विभागाचे पुन्हा मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय नव्या संचालक मंडळाने घेतला आणि त्यानुसार सप्टेंबर २०२२ मध्येच जिल्हा बँकेने या भरतीबाबत सहकार विभागाकडे मार्गदर्शन मागविले.

  • बॅंकेच्या या मागणीनुसार राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी ३० नोव्हेंबर २०२२ रोजीच जिल्हा बँकेला परवानगी दिलेली आहे.

  • अमरावती येथील ज्या संस्थेची या कर्मचारी भरतीसाठी नेमणूक करण्यात आली होती, त्याच संस्थेकडे सांगली जिल्हा बॅंकेच्या नोकर भरतीचेही काम होते.

  • मात्र सांगली बॅँकेच्या नोकर भरतीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आणि त्यात अमरावती येथील या संस्थेलाही प्रतिवादी करण्यात आले.

  • यामुळे पुणे जिल्हा बॅँकेची भरती प्रलंबित राहू शकते, या शक्यतेने लेखनिक भरती ही अमरावती येथील संस्थेकडून करण्यापेक्षा राज्यस्तरीय तालिका किंवा पॅनेलकडून करण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती.

जिल्हा बॅंक भरती दृष्टिक्षेपात

बॅंकेत भरावयाच्या पदाचे नाव - लेखनिक

लेखनिक पदाच्या रिक्त जागा - ३५६

जाहिरातीत नमूद केलेल्या जागा - ३५६

दाखल झालेले एकूण उमेदवारी अर्ज - ३२,३२०

परीक्षेसाठी आकारलेले शुल्क (प्रति विद्यार्थी) - ८२५ रुपये

परीक्षा शुल्कापोटी जमा झालेला महसूल - २६,६६,०४,००० रुपये

पॅनेलची नियुक्ती बाकी

या लेखनिक पदाच्या भरतीसाठी आवश्‍यक असलेले राज्यस्तरीय पॅनेल अद्याप अस्तित्वात आलेले नाही. शिवाय हे पॅनेल नियुक्ती करण्यासाठीची प्रक्रियाही सुरू झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर या पॅनेलच्या अस्तित्वावर जिल्हा बॅँकेची लेखनिक भरती अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शुल्कापोटी पावणे सत्तावीस कोटी जमा

प्रति उमेदवार प्रत्येकी ८२५ रुपये इतके परीक्षा शुल्क आकारण्यात आले होते. यानुसार या परीक्षेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांकडून परीक्षा शुल्कापोटी एकूण २६ कोटी ६६ लाख चार हजार रुपये जमा झालेले आहेत. हे शुल्क गेले कुठे? असा सवालही उपस्थित केला आहे.

टॅग्स :puneRecruitmentPDCC Bank