
पुणे : 'पेडल मिशनमुळे' गरजूंना पर्यावरण पुरक प्रवास
पुणे : तुमच्या घरी सायकल आहे का? तिचा जर तुम्ही वापर करत नसाल व ती खराब झाल्यामुळे तुम्ही तिला भंगारात विकणार असाल तर जरा थांबा. कारण तुमची हीच सायकल कोणा गरजूसाठी त्याचा प्रवास सुखकर करण्यास मदत करू शकता. अनेकांची गरज लक्षात घेत कोथरूडमधील आयडियल कॉलनीतील सायकल व्यावसायिक ४३ वर्षीय आनंद वाजपेयी यांनी ‘पेडल मिशन’ची एक अनोखी चळवळ सुरू केली आहे.
‘पेडल मिशन’मुळे समाजातील अनेक गरजू विद्यार्थी व नागरिक ज्यांना सायकल विकत घेता येत नाही त्यांना सहज सायकल उपलब्ध झाल्या आहेत. पेडल मिशनला एक वर्ष पूर्ण झाले असून आतापर्यंत ९०० हून अधिक लोकांना या उपक्रमाच्या माध्यमातून सायकल देण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर नुकतेच पेन येथे ५६ तर कळंब भागात २८ सायकल देण्यात आल्या आहेत.
याबाबत आनंद यांनी सांगितले, ‘‘शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. छोट्या-मोठ्या कामांसाठी साधं घराजवळ जायचं असेल तरी देखील लोकं गाड्यांचा वापर करताना दिसतात आणि मग त्यांचीच तक्रार असते की पुण्यातील वाहतूक कोंडी वाढत आहे. प्रत्येकाला दररोज सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे शक्य होईलच असे नाही. त्यात कोरोनामुळे अद्याप कांची आर्थिक गाडी रुळावर आलेली नाही. अशात पर्यावरण, वाहतुकीचा अत्यंत साधा पर्याय गरजू लोकांना उपलब्ध व्हावा यासाठी काही तरी करावे अशी कल्पना सुचली.
त्यात एके दिवशी एक मुलगी आमच्याकडे जुनी व खराब सायकल घेऊन आली. ती सायकल विकून नवीन सायकल घ्यायची होती. मग तिला ही सायकल एखाद्या गरजूला दे, त्यासाठी सायकल दुरुस्त आम्ही करू असे सांगितले. त्यानंतर ‘पेडल मिशन’ची सुरवात झाली. यामध्ये लोकांकडून त्यांची जुन्या, वापर होत नसलेली किंवा खराब झालेली सायकल घेऊन व ती दुरुस्त करून गरजूंना मोफत देतो. यासाठी समाज माध्यम किंवा सायकल मोहिमांच्या माध्यमातून लोकांना जुन्या सायकली दान करण्याचे आवाहन करतो. वापरात नसलेल्या सायकली दान केल्याने गरजूंना मदत होतेच, पण त्यामुळे पर्यावरणालाही अनेक प्रकारे मदत होते. स्वच्छ, हरित आणि सुंदर पर्यावरण हे येणाऱ्या पिढीचा अधिकार आहे असून आजच यासाठी पावले उचलणे गरजेचे आहेत, असेही ते म्हणाले.
हैदराबाद आणि गोव्यातही चळवळ सुरू
सायकलचा वापर वाढविणे तसेच आपल्या या अनोख्या उपक्रमाची माहिती पोचविणे व लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वाजपेयी यांनी पुणे ते कन्याकुमारी अशी खास सायकल मोहीम केली. या मोहिमेमुळे हैदराबाद आणि गोव्यात ही ‘पेडल मिशन’ला सुरवात झाली. वाहतूक कोंडी कमी व्हावी, मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे तसेच, हवेचे प्रदूषणाला आळा घालण्याकरिता सायकल हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे सायकलचा वापर जास्तीत जास्त व्हावा या अनुषंगाने हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, असे वाजपेयी यांनी सांगितले.
Web Title: Pune Pedal Mission Eco Friendly Travel Anand Vajpayee
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..