पुणेकरांची परदेशवारी होतेय ‘खर्चीक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Plane Journey

पुणे (लोहगाव) विमानतळावरून देशांतर्गत उड्डाणे वाढली असली तरीही अद्याप कोविडपूर्वी जी आंतरराष्ट्रीय उड्डाणे होत होती ती बंदच आहेत.

पुणेकरांची परदेशवारी होतेय ‘खर्चीक’

- प्रसाद कानडे

पुणे - पुणे (लोहगाव) विमानतळावरून (Pune Airport) देशांतर्गत उड्डाणे वाढली असली तरीही अद्याप कोविडपूर्वी जी आंतरराष्ट्रीय उड्डाणे (International Flights) होत होती ती बंदच (Close) आहेत. दुबई (Dubai) वगळता सिंगापूर (Singapore) आणि फ्रॅंकफर्टसाठी विमान (Plane) नसल्याने पुणेकरांना (Pune) मुंबई, दिल्ली, बंगळूर ही शहरे गाठावी लागत आहेत. यात मोठ्या प्रमाणात वेळ वाया जात आहे. शिवाय पाच ते सात हजार रुपयांचा अतिरिक्त बोजा पडत आहे. अशा प्रवाशांची संख्या सुमारे दीड ते दोन हजार आहे. त्यामुळे पुण्याहून थेट फ्लाइट सुरू झाल्यास त्यांचा हा फेरा वाचेल.

पुणे विमानतळावरून आता रोज देशांतर्गत सरासरी ८० विमानांचे उड्डाण होत आहे. यातून ३० ते ३५ हजार प्रवाशांची वाहतूक होते. कोविडपूर्वी जी स्थिती होती, त्या स्थितीला आता विमानतळ पोचले आहे. मात्र, त्या तुलनेत आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाल्या नाहीत. पुण्याहून केवळ दुबईसाठी विमानसेवा सुरू आहे. या व्यतिरिक्त कोणतीही आंतरराष्ट्रीय विमानसेवा नाही. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या, उद्योग असणाऱ्या शहरात आंतरराष्ट्रीय विमानसेवा नसणे ही खेदाची बाब म्हणावी लागेल.

प्रवासाची कारणे

पुण्याहून परदेशात जाणाऱ्या प्रवाशांमध्ये तीन घटकांतील प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. पर्यटन, नोकरी व नातेवाइकांकडे जाण्यासाठी पुणेकर परदेशवारी करतात. मुलामुलीकडे राहण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. नोकरी करणारा वर्ग हा प्रामुख्याने पुण्यातील हिंजवडी, बाणेर, पाषाण, कोथरूड, बालेवाडी, कोरेगाव पार्क या भागांत राहणारा आहे.

परदेशात प्रवासी जाण्याची ठिकाणे

पुण्याहून दुबई, सिंगापूर तसेच फ्रँकफर्टसाठी मोठ्या प्रमाणांत प्रवासी असतात. काही जण थेट येथेच उतरतात तर अनेक जण पुढच्या प्रवासासाठी कनेक्टिंग विमान पकडण्यासाठी या तीन ठिकाणचा प्रवास करतात. अशा प्रवाशांची संख्यादेखील मोठी आहे. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युरोप, मध्य आशिया या ठिकाणी जाण्यासाठी अनेक प्रवासी दुबई, सिंगापूर येथूनच पुढचा प्रवास करतात.

कोठून जावे लागते

पुण्याहून प्रवासी सेवा नसल्याने मुंबई, दिल्ली, बंगळूर व हैदराबादला जावे लागते. यात मुंबई वगळता उर्वरित तीन शहरांसाठी पुण्याहून विमानसेवा आहे. मुंबई विमानतळ गाठण्यासाठी मात्र कार किंवा खासगी टॅक्सीने प्रवास करावा लागतो. यात प्रवाशांचा बराच वेळ वाया जातो.

विनाकारण वाढतो खर्च

पुण्याहून मुंबई विमानतळावर टॅक्सीने रोज सुमारे १५०० प्रवासी जातात. शेअरमध्ये एक प्रवाशाला १५०० रुपयांचे भाडे द्यावे लागते. जर वैयक्तिक गेल्यास चार हजारांपर्यंत खर्च येतो. मुंबईत जर मुक्काम केल्यास भाडे व जेवणाचा खर्च गृहित धरून पाच ते सात हजार रुपयांचा खर्च येतो. तर दिल्ली, बंगळूर व हैदराबादला जाणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त डोमेस्टिक रूटवर प्रवास करावा लागतो. त्याचा खर्च पाच ते सहा हजार इतका येतो. त्यामुळे आर्थिक व वेळेचे असे दोन्ही प्रकारचे नुकसान सहन करावे लागते.

दुबई वगळता अन्य देशांत विमानसेवा सुरू होण्यासाठी पोषक वातावरण असले तरी त्यासाठी विमान कंपन्यांकडून प्रस्ताव आलेला नाही. तसा प्रस्ताव आल्यावर निश्चितच विचार करू.

- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे विमानतळ

देशांतर्गत उड्डाणे वाढली आहेत. हा चांगला संकेत आहे. परदेशी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता प्रशासनाने आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, तरच प्रवाशांची होणारी गैरसोय टळेल.

- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ

Web Title: Pune Peoples Going Abroad Are Expensive

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneAbroadExpensive
go to top