esakal | पुणेकरांनो काळजी घ्या! डेंग्यूचे १८ दिवसांत ८६ रूग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

dengur mosquito

पुणेकरांनो काळजी घ्या! डेंग्यूचे १८ दिवसांत ८६ रूग्ण

sakal_logo
By
सम्राट कदम @namastesamrat

पुणे : शहरात जुलै महिन्याच्या पहिल्या १८ दिवसातच डेंग्यूच्या तब्बल ८६ रुग्णांची नोंद झाली आहे. महापालिकेच्या किटक प्रतिबंधक विभागात या आकडेवारीची नोंद झाली असून, क्षेत्रीय कार्यालयाद्वारे जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनाही वाढविण्यात आल्या आहे. पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून, नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी केले आहे.

पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात डासांचा प्रादुर्भाव वाढतो पर्यायाने डेंग्यू, हिवताप, चिकनगून्या आदी आजारांची साथच तयार होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा आजारांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. लॉकडाउनच्या काळात गेल्या वर्षीपासून तुलनेने कमी रुग्णांची नोंद होत आहे. मात्र, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आशा आजारांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. येत्या काळात ही रूग्णसंख्या वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

क्षेत्रिय कार्यालये सक्रिय ः

महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे क्षेत्रीय कार्यालयाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. पाणी साचेल अशा सर्व जागांची तपासणी करून पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था केली जात आहे. डेंग्यूचा रूग्ण आढळल्यास त्या भागात औषध फवारणी केली जात आहे, अशी माहिती डॉ. वावरे यांनी दिली.

डेंग्यूची सर्वसाधारण लक्षणे ः

- डास चावल्यानंतर ३ ते ७ दिवसांदरम्यान तापाची लक्षणे

- रुग्णाला अचानकच खूप ताप आणि भरपूर थंडी वाजते

- रुग्णाचे डोकं प्रचंड प्रमाणात दुखू लागतं

- सांध्यामध्ये वेदना, घशात कायम दुखणं

- मानेवर, छातीवर आणि चेहऱ्यावर गुलाबी रंगाचे चट्टे येतात

नागरिकांनी घ्यावयाची काळजी ः

- आठवड्यातून किमान एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावी

- पाणी साठवलेल्‍या भांडयाना योग्‍य पध्‍दतीने व्‍यवस्थित झाकून ठेवावे

- घराभोवतालची जागा स्‍वच्‍छ आणि कोरडी ठेवावी

- घरांच्‍या भोवताली व छतांवर वापरात नसणारे टाकाऊ साहित्‍य ठेऊ नये

''नागरिकांनी घराच्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करावी. तसेच डेंग्यूची शक्यता वाटल्यास तातडीने क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधावा. कोरोनाच्या दृष्टीने आवश्यक नियमांचे पालन करावे. त्याचबरोबर पावसाळ्यातील साथीच्या रोगांच्या दृष्टीनेही काळजी घेणे आवश्यक"

- डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य प्रमुख, पुणे महापलिका

१) वर्षभरातील डेंग्यूंची रूग्णसंख्या ः

महिना ः संशयित ः बाधित

जानेवारी ः २७५ ः २२

फेब्रुवारी ः ७९ ः ६

मार्च ः १९१ ः २

एप्रिल ः १६९ ः १

मे ः १६२ ः ०

जून ः २०१ ः ०

जुलै ः ८६ ः ८६

२) जानेवारी ते जुलै महिन्यातील डेंग्यू रूग्णांचे प्रमाण

वर्ष ः संशयित रूग्णसंख्या ः बाधित

२०१९ ः ८४४ ः १५२

२०२० ः ३०३ ः ७

२०२१ ः ११६३ ः ११७

loading image