Pune : बिबट्याच्या हल्ल्यात महिला मृत्युमूखी

बिबट्याला पकडण्यासाठी पिंपरखेड परिसरात तातडीने पाच पिंजरे लावले
Leopard Attack
Leopard Attackesakal

शिरूर : तालुक्याच्या बेट भागात बिबट्याची दहशत कायम असतानाच, पिंपरखेड (ता. शिरूर) परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याने खळबळ उडाली आहे. बोंबेमळा परिसरातील कुऱ्हाडे वस्तीनजीक बुधवारी (ता. १) रात्री नऊच्या सुमारास ही दूर्दैवी घटना घडली.

पूजा जालिंदर जाधव (वय २२, रा. टाकेवाडी, कळंब, ता. आंबेगाव) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमूखी पडलेल्या महिलेचे नाव असून, शिरूर मध्ये शवविच्छेदन करून आज सकाळी त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आला.

या घटनेनंतर, शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर; तसेच सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर व पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले यांनी घटनास्थळी भेट दिली असून, बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात तातडीने पाच पिंजरे लावण्यात आले असल्याची माहिती म्हसेकर यांनी दिली.

मृत पूजा जाधव या आपले पती जालिंदर जाधव व दीर विश्वास जाधव यांच्यासह फाकटे (ता. शिरूर) येथे नातेवाईकांकडे आल्या होत्या. नातेवाईकांची भेट घेऊन परत कळंब येथे जात असताना बोंबेमळा परिसरातील कुऱ्हाडे वस्तीजवळ लघूशंकेसाठी थांबले असताना उसाच्या फडात दबा धरून बसलेल्या बिबट्याने पूजा जाधव यांच्यावर झेप घेतली. अंधारात अचानक झालेल्या या हल्ल्याने जालिंदर जाधव व विश्वास जाधव यांची भंबेरी उडाली. मात्र, त्याचवेळी बिबट्याने पूजा यांना फरफटत उसाच्या फडात नेले.

त्यावेळी जाधव यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर कुऱ्हाडे वस्ती व परिसरातील काही तरूण त्यांच्या मदतीला धावले. तरूण दांडके हातात घेऊन उसाच्या फडात शिरल्यावर बिबट्याने धूम ठोकली. त्यावेळी पूजा या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांच्या मानेचे, हाताचे बिबट्याने लचके तोडले होते, अशी माहिती विश्वास जाधव यांनी दिली. त्या जागीच गतप्राण झाल्या होत्या.

या घटनेनंतर तरूणांनी उसाच्या फडाला चोहोबाजूंनी घेरले. त्यावेळी डरकाळ्या फोडत बिबट्याने धूम ठोकली. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली. घटनास्थळी आलेल्या वनखात्याच्या अधिकाऱ्यांवर व पोलिस अधिकाऱ्यांवरही स्थानिकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. बिबट्याच्या हल्ल्यात आणखी किती बळी गेल्यावर वनखात्याला जाग येणार आहे, असा सवाल पिंपरखेड चे सरपंच राजेंद्र दाभाडे यांनी केला. बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याबाबत धोरणात्मक पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

मृत पूजा जाधव यांच्यावरील बिबट्याच्या हल्ल्यानंतर, बिबट्याला पकडण्यासाठी पिंपरखेड परिसरात तातडीने पाच पिंजरे लावले असून, आवश्यकता भासल्यास आणखीही पिंजरे लावण्यात येतील. पूजा जाधव यांच्या कुटूंबियांना वनखात्याकडून वीस लाख रूपयांची तातडीची दत देण्यात येणार आहे.

मनोहर म्हसेकर

वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरूर

गेल्या दोन वर्षात, शिरूर तालुक्यात बिबट्याच्या मानवावरील हल्ल्याच्या दहा घटना घडल्या असून, त्यात चारजणांचा मृत्यु झाला आहे. पाळीव जनावरांवरील हल्ले तर नित्याचेच झाले आहेत. यापूर्वी सहा ऑक्टोबर २०२१ रोजी जांबूत च्या जोरी लवण परिसरात समृद्धी योगेश जोरी या साडेतीन वर्षांच्या बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यु झाल्यानंतर बरोबर एक वर्षांनी १२ ऑक्टोबर २०२२ ला जांबूतच्याच जोरी वस्तीवर पूजा भगवान नरवडे (वय १९) या महाविद्यालयीन विद्यार्थीनी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली.

तत्पूर्वी, सहा सप्टेंबर २०२२ रोजी जोरी वस्तीजवळील उसाच्या फडात सचिन बाळू जोरी (वय ३६) यांचा मृतदेह आढळून आला. छिन्नविछीन्न अवस्थेत त्यांचा मृतदेह मिळूनही वनखात्याने अद्याप त्यांचा मृत्यु हा बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याच्या शक्यतेला दूजोरा दिला नाही. त्यामुळे सचिन जोरी यांचे कुटूंबिय शासकीय मदतीपासून वंचित आहेत.

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमूखी पडलेल्या पूजा जाधव यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार असून, काल शिरूर तालुक्यातील पाहुण्यांकडे येताना त्यांची छोटी मुले आईच्या मागे लागली होती. परंतू, थंडी जास्त असल्याने त्यांनी मुलांना सोबत घेण्याचे टाळले. रात्री घरी परतायला उशीर होत असल्याने मुले आईची वाट पाहात होते. परंतू, रस्त्यातच बिबट्याच्या हल्ल्याच्या निमीत्ताने त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने आईची मुलांशी कायमचीच ताटातूट झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com