

पुणे, ता. २१ : पुढील वर्षभरात ‘पीएमपी’च्या ताफ्यात नव्या दोन हजार ५०० बस दाखल होणार आहेत. त्यामुळे ‘पीएमपी’च्या डेपोमध्ये सुधारणा करून पायाभूत सुविधा पुरविण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिले आहेत.
पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ‘पीएमपी’चे सक्षमीकरण आवश्यक आहे. सध्या ‘पीएमपी’च्या ताफ्यात सुमारे १९०० बस आहेत, तर प्रवाशांची दैनंदिन संख्या ११ ते १२ लाख इतकी आहे. नादुरुस्त व अपुऱ्या बसमुळे प्रवाशांची गैरसोय होते. ताफ्यातील बस संख्या वाढवण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये पीएमआरडीए ५०० कोटी रुपये, पुणे महापालिका १५० कोटी रुपये आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे १०० कोटी रुपये अशा एकूण ७५० कोटी रुपयांच्या निधीतून एक हजार सीएनजी बस घेतल्या जाणार आहेत. केंद्र सरकारच्या ई-ड्राइव्ह योजनेतून एक हजार सीएनजी बस मिळणार आहेत.
आयुक्त नवलकिशोर राम म्हणाले, ‘‘पीएमपीच्या ताफ्यात मार्च अखेरपर्यंत एक हजार बस दाखल होणार आहेत, तर पुढील वर्षभरात दीड हजार बस दाखल होतील. या बस दाखल होण्यापूर्वी बस डेपोंमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. विद्युत पुरवठा, डेपोमध्ये डांबरीकरण, सीमाभिंत बांधणे आदी कामे करणे आवश्यक आहे.’’
जागेअभावी बस रस्त्यावर
सध्या बस डेपोंची अवस्था वाईट आहे. बस दुरुस्त करण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने या कामात अडचणी येतात. रात्रीच्या वेळी बस रस्त्यावर थांबवाव्या लागत असल्याने सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळेच बस डेपोच्या जागेत सुधारणा करण्यासंदर्भात महापालिकेत बैठक पार पडली. या वेळी ‘पीएमपी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.