
PMPMLच्या खासगी कंत्राटदारांचा संप; वाहतूकीत खोळंबा
पुणे : पीएमपीएमएलच्या खाजगी ठेकेदारांनी शुक्रवार सकाळपासून बस वाहतूक अचानक थांबवली. त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे सहाशे बसची वाहतूक बंद झाली आहे. थकबाकी मिळावी म्हणून हा संप करण्यात आल्याचं वाहतूकदारांचे म्हणणं आहे, तर हा दबावतंत्राचा भाग असल्याचे पीएमपीने स्पष्ट केले आहे. मात्र या संपामुळे प्रवाशांचे नुकसान होत आहे. दरम्यान, ठेकेदारांवर अत्यावश्यक सेवा कायद्यान्वये (मेस्मा) कारवाई कारवाई करण्याची नोटीस पीएमपीने सर्व ठेकेदारांना पाठवली आहे.
पीएमपीमध्ये सुमारे सात खाजगी ठेकेदारांच्या 956 बस भाडेतत्त्वावर धावतात. यापैकी सुमारे 650 ते 700 बस दररोज मार्गांवर धावतात. या बसची वाहतूक शुक्रवार सकाळपासून बंद झाली. त्यामुळे पीएमपी प्रशासनाची तारांबळ उडाली. याबाबत एका खाजगी ठेकेदाराकडे विचारणा केली असता गेल्या आठ महिन्यांची 107 कोटी रुपयांची थकबाकी अद्याप मिळाली नसल्याबद्दल हा संप केला असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ठेकेदारांपैकी बीव्हीजी ग्रूपने संपातून अंग काढून घेतले असून त्यांच्या 100 बस मार्गांवर आल्या आहेत.
हेही वाचा: काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी काय आहे प्रशांत किशोर यांचा प्लॅन?
पीएमपीच्या सह व्यवस्थापिका संचालक डॉ. चेतन केरुरे म्हणाल्या ठेकेदारांना गुरुवारीच 54 कोटी रुपये मंजूर केले आहेत. ते पैसे आज त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. संप करण्याचे वेगळेच कारण आहे, ठेकेदारांकडून बस कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा निधी दिला जात नाही, अशा कर्मचाऱ्यांकडून तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल घेऊन या कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी वेळेत भरण्याचा त्यांना आदेश देण्यात आला आहे. तसेच याबाबत प्रशासनाने पडताळणी ही सुरू केली आहे, त्याचा राग येऊन हा संप झाला असावा, असे वाटते. परंतु प्रशासनाने पीएमपीच्या 1200 पैकी जास्तीत जास्त गाड्या रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच संपर्क करणाऱ्या ठेकेदारांना अत्यावश्यक सेवा कायद्यान्वये नोटीसही बजावण्यात आली आहे.
Web Title: Pune Pmpml Private Contractor Strike
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..