
Pune News : 'आता बास.... आजचा दिवस शेवटचा, यापुढे कोणालाही त्रास होणार नाही...
किरकटवाडी : 'आता बास झाले माझ्यामुळे सर्वांना त्रास झाला. आजचा दिवस शेवटचा. यापुढे कोणालाही त्रास होणार नाही सॉरी'. घरातून निघून गेलेल्या तरुणाचा पाच दिवसांनंतर असा मेसेज येतो आणि पुन्हा फोन बंद होतो.
घाबरलेले नातेवाईक थेट हवेली पोलीस ठाण्यात जातात. पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, ठाणे अंमलदार अजय पाटसकर, पोलीस नाईक दिपक गायकवाड असे सर्वजण तातडीने कार्यवाही सुरू करतात, परंतु पुणे ग्रामीण पोलीसांच्या सायबर क्राईम विभागातील कोणीच फोन उचलत नसल्याने सर्व हतबल होतात.
मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास थेट पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ते स्वतः तातडीने वरिष्ठ पातळीवरून लक्ष घालतात. झोपलेला सायबर क्राईम विभाग खडबडून जागा होतो आणि तरुणाचे लोकेशन मिळते. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस नाईक दिपक गायकवाड व नातेवाईक संबंधित ठिकाणी जाऊन तरुणाला ताब्यात घेतात आणि सर्वच सुटकेचा निःश्वास सोडतात.
पाच दिवसांपूर्वी खडकवासला येथे नातेवाईकांकडे आलेला तरुण आर्थिक विवंचनेतून कोणालाही न सांगता घरातून निघून गेला होता. याबाबत हवेली पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस व नातेवाईक तरुणाचा शोध घेत होते परंतु फोन बंद असल्याने काहीच थांगपत्ता लागत नव्हता.
काल (दि. 21) रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणाचा संशयास्पद मेसेज आला आणि त्याने पुन्हा फोन बंद करून ठेवला. घाबरलेले नातेवाईक तातडीने हवेली पोलीस ठाण्यात पोहचले व पोलीसांना याबाबत माहिती दिली.
नातेवाईक पोलीस ठाण्यात बसून असल्याने हवेली पोलीसांनी कार्यवाही सुरू केली. ज्यावेळी फोन चालू होता ते लोकेशन मिळणे आवश्यक असल्याने त्यासाठी सायबर क्राईम विभागाकडे पाठपुरावा सुरू होता. रात्रीचे बारा वाजून गेले तरी सायबर क्राईम विभागाकडून कोणाताही प्रतिसाद मिळत नव्हता.
अखेर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना माहिती मिळताच त्यांनी वरिष्ठ पातळीवरून कार्यवाही सुरू केली. सायबर क्राईम विभागातील झोपलेले कर्मचारीही जागे झाले आणि काही मिनिटांतच लोकेशन मिळाले.
पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या सूचनेनुसार पोलीस नाईक दिपक गायकवाड नातेवाईकांसह संबंधित लोकेशनवर पोहोचले आणि मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तरुणाला ताब्यात घेण्यात आले. मध्यरात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेबद्दल तरुणाच्या नातेवाईकांनी त्यांचे आभार मानले.
धक्कादायक बाबींचा खुलासा तरुणाला पोलीस ठाण्यात घेऊन आल्यानंतर घरातून निघून जाण्याचे कारण विचारण्यात आले असता अगोदर शेअर मार्केट मध्ये तब्बल 43 लाख रुपये बुडाल्याचे व त्यामुळे नैराश्य आल्याचे तरुणाने सांगितले.
तरुण समाधानकारक उत्तरे देत नसल्याने पोलीस नाईक दिपक गायकवाड यांनी त्याचे सोशल मीडियावरील अकाऊंटस् तपासले असता अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाला. केवळ आपण खुप मोठे आहोत हे दाखवण्यासाठी आणि मौजमजेसाठी तरुणाने काही वर्षांत सुमारे पन्नास लाख रुपये उडवल्याची कबुली त्याने दिली.
आता घरच्यांना, नातेवाईकांना, मित्र परिवाराला काय उत्तर द्यायचे? या विवंचनेतून तो घरातून निघून गेल्याचे त्याने सांगितले. घरातील सर्व व्यवहार ताब्यात दिल्यानंतर एकूलत्या एक मुलाने विश्वासघात करत मौजमजेसाठी केलेल्या लाखो रुपयांच्या उधळपट्टीचे आकडे ऐकून नातेवाईकांचे पोलीस ठाण्यातच डोळे भरुन आले होते.