esakal | पुण्यात रेमडेसिव्हीरचा काळाबाजार करणारा फार्मासिस्ट गजाआड; प्रिस्क्रीप्शन चोरुन मिळवायचा इंजेक्शन

बोलून बातमी शोधा

पुण्यात रेमडेसिव्हीरचा काळाबाजार करणारा फार्मासिस्ट गजाआड; प्रिस्क्रीप्शन चोरुन मिळवायचा इंजेक्शन
पुण्यात रेमडेसिव्हीरचा काळाबाजार करणारा फार्मासिस्ट गजाआड; प्रिस्क्रीप्शन चोरुन मिळवायचा इंजेक्शन
sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी औषधे पुरविण्याचे मोलाचे काम फार्मासिस्टकडून केले जाते. परंतु एका फार्मासिस्टने रेमडेसिव्हीरसारखे इंजेक्‍शन काळ्याबाजाराने विक्री करण्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. इथपर्यंत ठिक होते, मात्र फार्मासिस्टने एका कोरोना रुग्णाचे रेमडेसिव्हीर इंजेक्‍शनचा उल्लेख असलेले डॉक्‍टरांचे प्रिस्क्रीप्शन चोरुन, त्यावरुन सरकारी रुग्णालयातून ते इंजेक्‍शन मिळवित त्याची काळ्याबाजाराने विक्री करीत असल्याची माहिती पुढे आली. एकीकडे कोरोना रुग्ण एका श्‍वासासाठी झगडत असताना, दुसरीकडे मात्र पैशांची लालसा माणसाला इतक्‍या खालच्या थराला घेऊन जात असल्याचे दुर्दैवी वास्तव दिसू लागले आहे.

अंकीत विनोद सोळंकी (वय 26, रा.दापोडी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील हॉटेल जायकाच्या जवळ एक तरुण कोरोना रुग्णांसाठी आवश्‍यक रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन काळ्याबाजाराने विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) शब्बीर सय्यद यांना मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक सय्यद यांनी तपास अधिकारी प्रभाकर कापुरे व पोलिस कर्मचाऱ्यास साध्या वेशामध्ये बनावट ग्राहक बनवून हॉटेल जायकाजवळ पाठविले. त्यानुसार, हॉटेल जायकाजवळील आडबाजुला सोळंकी हा कापुरे यांना घेऊन गेला. तेथे त्यांना दोन रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन दाखवून एका इंजेक्‍शनसाठी 10 हजार रुपयांची मागणी केली. ते 10 हजार रुपये रोख घेऊन दुसऱ्या इंजेक्‍शनचे 10 हजार रुपये ऑनलाईन स्वरुपात देण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यास अटक केली.

हेही वाचा: 'आम्ही निधी देऊ, पण रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन द्या'; पुणे महापौरांची मागणी

रुग्णाचे प्रिस्क्रीप्शन चोरुन मिळविले इंजेक्‍शन

पोलिसांनी सोळंकीकडे त्याने इंजेक्‍शन कुठून व कसे मिळविले, याबाबत चौकशी केली. तेव्हा डॉक्‍टरने ज्या रुग्णाला रेमडेसिव्हीर इंजेक्‍शनची आवश्‍यकता आहे, त्या रुग्णाच्या नावाने लिहून दिलेले प्रिस्क्रीप्शन चोरुन, त्याचा गैरवापर करून ससून रुग्णालयातील संजीवनी मेडीकल स्टोअर्समधून खरेदी केल्याचे सांगितले. तसेच ते इंजेक्‍शन चढ्या भावाने काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली. कोंढवा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फसवणूक, औषध किंमत नियंत्रण आदेशी, जीवनावश्‍यक वस्तुंचे अधिनीयम 1955 चे उल्लंघन, औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा यांसारख्या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलिसांनी ही कारवाई केली.