
Pune : पोलिसांकडून चार कोटींचा अमली पदार्थांचा साठा नष्ट
पुणे : शहरातील अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांकडून जप्त केलेल्या ७६१ किलो अमली पदार्थांची होळी करत पुणे पोलिसांनी हे पदार्थ नष्ट केले. त्यात गांजा, कोकेन, मेफेड्रोन, चरस, हिरॉईन अशा ड्रग्जचा समावेश होता. चार कोटी १० लाख रूपये किमतीच्या अमली पदार्थांची रांजणगाव येथील एमईपीएल कंपनीच्या भट्टीत विल्हेवाट लावण्यात आली.
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकांनी २०२२ या वर्षभरात ७६१ कोटी ५७५ ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले होते. शहरातील १६ पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली होती. बाजारभावानुसार या अमली पदार्थांची किंमत चार कोटी १० लाख सहा हजार रूपये इतकी होती. अमली पदार्थ विरोधी पथकांनी जप्त केलेल्या ड्रग्जमध्ये सर्वाधिक गांजाचा समावेश होता.
या अमली पदार्थांचा पुनर्वापर होऊ नये, यासाठी तो रांजणगाव येथील कंपनीच्या भट्टीत जाळून नष्ट करण्यात आला. पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि रासायनिक प्रयोगशाळेतील अधिकारी या वेळी उपस्थित होते.
तस्करांकडून तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांमधून पुणे शहरात गांजाची तस्करी केली जाते. पुणे, मुंबईसह इतर शहरांमध्ये तस्करांची टोळी कार्यरत असून, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून अमली पदार्थांची तस्करी करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. यापुढेही तस्करांविरुध्द कारवाई सुरूच राहील, असे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले.