पुणे पोलिसांनी पूर्ण केली डॉक्टर दाम्पत्याची 'ती' इच्छा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे पोलिसांनी पूर्ण केली डॉक्टर दाम्पत्याची 'ती' इच्छा...

पुणे पोलिसांनी पूर्ण केली डॉक्टर दाम्पत्याची 'ती' इच्छा...

पुणे : ते दोघेही डॉक्‍टर, कोरोनाच्या काळात सकाळी नऊ वाजता घराबाहेर पडल्यानंतर दोघेही रुग्णसेवा करून रात्री उशीरा घरी परततात. शनिवारी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. पण रुग्णसेवा, लॉकडाऊन आणि वेळेच्या अभावामुळे त्यांना एकमेकांसाठी ना केक घेता आला, नाही एखादे गिफ्ट. अखेर डॉक्‍टर पतीने त्यांच्या मनातील ही खदखद पुणे पोलिसांच्या @cppunecity ट्विटरवर टाकली आणि शनिवारी सकाळी ठिक साडे आठ वाजता, डॉक्‍टरांच्या घराची बेल वाजली, त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा, "हॅपी ऍनिव्हर्सरी' म्हणत एक पोलिसाने डॉक्‍टर दाम्पत्यास शुभेच्छा देत त्यांच्या हातात केकचा बॉक्‍स दिला. पुणे पोलिसांच्या या "सरप्राईज गिफ्ट'ने डॉक्‍टर दाम्पत्य अक्षरशः भारावून गेले, त्यांनी भरभरून कौतुक करीत थेट पोलिस आयुक्तांचे आभार मानले ! (Pune police fulfills doctor couples wish to celebrate marriage anniversary)

हेही वाचा: गावातील पहिल्या जम्बो कोविड सेंटरला 24 कोटी 24 लाखाचा निधी

डॉक्‍टर आणि पोलिस दोघेही कोरोना संसर्गाच्या कालावधीत पुणेकरांचे जीव वाचविण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्यांमधीलच एक महत्वाचा घटक. लॉकडाऊनमध्ये पोलिस रात्रंदिवस रस्त्यावर थांबून नागरीकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी गेले वर्षभरापासून काळजी घेत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे सरकारी किंवा खासगी रुग्णालये, छोटे-मोठे दवाखाने किंवा एखादे क्‍लिनीकमधूनही रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी झटणारा दुसरा महत्वाचा घटक म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्‍टर्स. रुग्णांची सेवा करणाऱ्या औंधमधील अशाच एका डॉक्‍टर दाम्पत्याचा शनिवारी लग्नाचा वाढदिवस होता. खरतर लॉकडाऊन असल्यामुळे मनसोक्तपणे शॉपींग करण्याची कुठलीच संधी नाही. त्यातही दोघेही सकाळी नऊ वाजता घरातून बाहेर पडल्यानंतर थेट रात्री उशीरा घरी परत येतात. त्यामुळे बाहेर जाऊन साधा केक आणण्यासाठीही वेळ मिळत नाही.

हेही वाचा: तिसऱ्या लाटेचा विचार करुन नियोजन करा : अजित पवारांच्या सूचना

या अशा स्थितीतच डॉक्‍टर पतीने शुक्रवारी थेट पुणे पोलिसांच्या @cppunecity या ट्टिर हॅंडलवर एक ट्विट केले. ""सर माझ्या लग्नाचा उद्या वाढदिवस आहे आणि सगळीच दुकाने बंद आहेत. केक आणण्यासाठीही जाऊ शकत नाही. आम्ही दोघेही डॉक्‍टर असून लग्नाच्या वाढदिवस असतानाही आम्ही कामावर आहोत. पत्नीसाठी अशा परिस्थितीत पत्नीला काय गिफ्ट देऊ, तुम्हीच सांगा.'' डॉक्‍टर पतीने हृदयाला हात घालणारी अशी भावनिक साद थेट पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनाचा घातली. पोलिस आयुक्त गुप्ता यांनीही ते ट्‌विट आवर्जुन पाहिले. मात्र त्यांनी "त्या' ट्‌विटला तत्काळ प्रतिसाद दिला नाही. पोलिस आयुक्तांनी त्यांच्या पद्धतीने पोलिसांना सुचना पाठविली.

हेही वाचा: MP राजीव सातव यांना न्युमोनियाचा संसर्ग

शनिवारी सकाळी ठिक साडे आठ वाजता, डॉक्‍टरांच्या घराची बेल वाजली, डॉक्‍टरांनी दरवाजा उघडला तेव्हा, "हॅपी ऍनिव्हर्सरी' म्हणत एका पोलिसाने डॉक्‍टर दाम्पत्यास शुभेच्छा दिल्या. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी दाम्पत्याच्या हातात केकचा बॉक्‍स दिला. पुणे पोलिसांनी दिलेल्या या "सरप्राईज गिफ्ट'ने डॉक्‍टर दाम्पत्यही अक्षरशः भारावून गेले, ""पुणे पोलिस दलाचे मनापासून आभार. पुणे पोलिसांनी दिलेली हि सुंदर भेट आमच्यासाठी वेगळा आनंद देणारी आहे'' अशा शब्दात पुणे पोलिसांचे भरभरून कौतुक करीत त्यांनी थेट पोलिस आयुक्तांचे आभार मानले.

Web Title: Pune Police Fulfills Doctor Couples Wish To Celebrate Marriage

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..