पुण्यात कर्णकर्कश साउंडवर बंदी

पुण्यात कर्णकर्कश साउंडवर बंदी
Published on

पुणे, ता. २५ : गणेशोत्सव आणि दहीहंडीमध्ये तीव्र आवाजाच्या साउंडला (डीजे) बंदीच असल्याची स्पष्ट भूमिका पुणे पोलिसांनी घेतली आहे. मिड प्रेशर, तसेच प्लाझ्मा असणाऱ्या साउंडवर थेट जप्तीची कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा करण्याची मागणी गणेश मंडळे आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. मात्र, पुणे पोलिसांनी साउंडच्या कर्णकर्कश आवाजाला स्पष्ट विरोध दर्शविला असून, उत्सव साजरा करण्यास विरोध नाही; मात्र तीव्र आवाज करणाऱ्या साउंडवर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. नियमांचे उल्लंघन करून तीव्र आवाजात साउंड वाजविल्यास थेट जप्ती केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने सोमवारी महापालिकेत विविध विभाग, पोलिस प्रशासन व गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडण्यासाठी विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. या वेळी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून उत्सवावरील निर्बंध शिथिल करून निर्बंधमुक्त वातावरणात सण साजरा करण्याची मागणी केली होती.

साउंडची नियमावली होणार :
ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत निश्‍चित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहणार आहे. आवाजाची निर्धारित मर्यादा ओलांडली जाऊ नये, यासाठी ध्वनीची पातळी निश्‍चित केली जाणार आहे. साउंडमध्ये किती ‘बेस’ आणि किती ‘टॉप’ वापरता येतील, याबाबतही नियमांच्या चौकटीत चर्चा करण्यात येणार आहे.

नियमभंग केल्यास थेट जप्ती :
नियमांचे उल्लंघन करून निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात साउंड वाजविणाऱ्या मंडळांवर कारवाई केली जाणार आहे. थेट जप्ती करण्यात येईल. साउंड, प्लाझ्मा, तसेच मिड प्रेशरसारख्या कर्णकर्कश आवाज करणाऱ्या साधनांवर पूर्णपणे बंदी राहणार, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.

‘‘उत्सव साजरा करण्यास आमचा विरोध नाही. मात्र, ध्वनिप्रदूषण करणाऱ्या तीव्र आवाजाला परवानगी दिली जाणार नाही. प्लाझ्मा आणि प्रेशर हॉर्नवर पूर्णपणे बंदी राहील. आवाजाची ठरलेली मर्यादा आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट जप्तीची कारवाई केली जाईल.’’
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com