Pune : तोतया पोलीस अधिकाऱ्याची पोलीस चौकीत पोलीसांनाच अरेरावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : तोतया पोलीस अधिकाऱ्याची पोलीस चौकीत पोलीसांनाच अरेरावी

पुणे : अदखलपात्र तक्रार दाखल असलेल्या नागरिकाला तुमच्या तक्रारीत मदत करतो मात्र मला मोबदला द्यावा लागेल असा फोन करणाऱ्या व त्यांनतर प्रत्यक्ष पोलीस चौकीत येवून अरेरावी करत रूबाबात आलेल्या तोतया पोलीस अधिकाऱ्याला खेड पोलीसांनी गजाआड केले आहे, संदिपराजे गणतराव निंबाळकर असे या तोतया पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

आपण पोलीस निरीक्षक असुन आपले थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध आहे असे फोनवरून सांगुन पोलिसात तक्रार दाखल असलेल्या तक्रारदाराला मदत करतो म्हणणाऱ्या व त्याबाबत चौकशी करणाऱ्या पोलिसांवर रूबाब करणाऱ्या तोतया पोलीस निरीक्षकाला खेड पोलिसांनी गजाआड केल्याची खळबळजनक घटना खेड पोलीस ठाण्यात घडली आहे, संदिपराजे गणतराव निंबाळकर असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलीस सुनिल ज्ञानेश्वर बांडे यांनी तक्रार दाखल केली आहे.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार रोहन सिताराम गायकवाड, रा विश्वकल्याण सोसायटी, शिरोली यांच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार दाखल असून त्यांना शुक्रवार ता. १५ रोजी तोतया निंबाळकर याचा फोन आला की मी तुम्हाला तुमच्या तक्रारीत मदत करतो, त्याचा मोबदला द्यावा लागेल. गायकवाड यांनी खेड पोलिसांना याबाबतीत माहिती दिल्यावर पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ चौकशी सुरू केली. तोतया निरीक्षकाला फोनवर विचारणा करून पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले.

दुचाकीवर पुढे-मागे पोलीस लिहिलेल्या आणि पोलिसांचा अधिकृत लोगो असलेल्या दुचाकीवर रूबाबात हे महाशय पोलीस ठाण्यात हजर झाले. मात्र चौकशीअंती पोलिसांनी त्याचा खरा चेहरा समोर आणला. आपल्याकडील बनावट ओळखपत्र दाखवत मी नागपूर म्ध्ये ट्रेनिंग घेऊन प्रथम पोलीस निरीक्षक व नंतर सहा वर्षे आजारी रजा घेऊन थेट पोलीस निरीक्षक झाल्याचे त्याने पोलीस निरिक्षक सतिशकुमार गुरव यांना सांगितले होते. अखेर चौकशीत हा तोतया निघाला आणि पोलिसांनी त्याला गजाआड केले.

खोलवर चौकशी केली असता एका अतिरिक्त पोलीस अधीक्षकाच्या बायकोचा हा भाऊ म्हणजेच मेहुणा असल्याचे समजते आहे. याचाच गैरफायदा घेवून तोतया निरीक्षकाने आणखी कोणकोणत्या तक्रारीत किती जणांना मदत केली, किती माया गोळा केली याचा शोध खेड पोलिस घेतीलच मात्र अधिकृतपणे पोलिसां कडुन या तोतयाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी नातेसंबंध असल्याचे स्पष्टपणे सांगीतले नाही.