संभाजी भिडेंना पुणे पोलिसांचा इशारा; नवे पायंडे पाडू नका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

"संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहल्याच्या वर्षानुवर्ष सुरु असलेल्या परंपरा यापुढे ही कायम राहतील. परंतु त्यामध्ये  नवीन पायंडे पाडण्याचा प्रयत्न करु नये."
- मितेश घट्टे, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा.

पुणे : पालखी सोहळ्याच्या वर्षानुवर्ष सुरु असलेल्या परंपरा यापुढे ही कायम राहतील, त्यामध्ये नवीन पायंडे पाडण्याचा प्रयत्न करु नयेत, असा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे. हा इशारा अप्रत्यक्षरीत्या शिव प्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनाच असल्याची शक्यता आहे. 

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्याचे बुधवारी सायंकाळी पुणे शहरात आगमन होत आहे. संभाजी भिडे यांनी दोन वर्षापुर्वी पालख्या फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर आल्या असताना आपल्या हजारो कार्यकर्तेसमवेत हातात तलवारी घेऊन "वारकरी यांच्यासमवेत धारकरी" असा नवा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा दोन्ही पालखी प्रमुखासह लाखो वारकरी संप्रदायाने तीव्र स्वरुपाचा निषेध नोंदविला होता. दरम्यान मागील वर्षी भिड़े व त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी हातामध्ये तलवारी घेण्याचे टाळत शिवाजीनगर येथे पालखी सोहळ्यात सहभाग घेऊन पालख्याच्या रथाचे स्वारथ्य केले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात कड़ेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या पार्श्वभुमीवर उद्या शहरात दाखल होणाऱ्या पालखी सोहळ्यात भिडे व त्यांचे कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर पोलिसांनी पालखी सोहळ्यात नवे पायंडे पाडु नयेत असा इशारा दिला आहे. याबरोबरच पालखी सोहळ्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे पोलिसांकडून सुरक्षिततेच्यादृष्टिने काळजी घेण्यात आली आहे. 

"संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहल्याच्या वर्षानुवर्ष सुरु असलेल्या परंपरा यापुढे ही कायम राहतील. परंतु त्यामध्ये  नवीन पायंडे पाडण्याचा प्रयत्न करु नये."
- मितेश घट्टे, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune police warns Sambhaji Bhide ahede of Wari 2019