पोलिस चौकीतच महिलेस मारहाण करणारा पोलिस अखेर निलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

रस्त्यावर अडथळा ठरणारी दुचाकी काढण्यास सांगितल्याच्या रागातून महिलेस पोलिस चौकीत बोलावून जबर मारहाण करणाऱ्या पोलिसाला अखेर निलंबीत करण्यात आले.

पोलिस चौकीतच महिलेस मारहाण करणारा पोलिस अखेर निलंबित

पुणे - रस्त्यावर अडथळा ठरणारी दुचाकी काढण्यास सांगितल्याच्या रागातून महिलेस पोलिस चौकीत बोलावून जबर मारहाण करणाऱ्या पोलिसाला अखेर निलंबीत करण्यात आले आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित पोलिसाविरुद्ध वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान, संबंधित पोलिसाला अद्यापही अटक झालेली नाही.

राहुल शिंगे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी 50 वर्षीय व्यापारी महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. महिलेस मारहाणीची घटना 19 ऑक्‍टोबर रोजी दुपारी एक वाजता महात्मा फुले मंडई पोलिस चौकीत घडली होती. फिर्यादी महिलेचे महात्मा फुले मंडई पोलिस चौकीशेजारी दुकान आहे, तर शिंगे हा खडक पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. 19 ऑक्‍टोबर रोजी साध्या वेषातील शिंगे हा त्याच्या साथीदारासह मंडई चौकीजवळ आला. त्यावेळी दुचाकी फिर्यादीच्या दुकानासमोरील रस्त्यावर लावण्यावरुन शिंगे याने फिर्यादीसमवेत हुज्जत घालून त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने महिलेस पोलिस चौकीत बोलावून जबर मारहाण केली. त्यामध्ये महिलेच्या डोळ्याला व चेहऱ्याला जबर दुखापत झाली.

दरम्यान, याप्रकरणी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार घेण्यास विश्रामबाग पोलिस ठाण्यातील पोलिसांनी टाळाटाळ केली. त्यानंतर संबंधित प्रकरण पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांच्यापर्यंत गेले. त्याचवेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही पोलिस आयुक्त गुप्ता यांना या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. दरम्यान, पोलिस उपायुक्त नारनवरे यांनी फरासखाना विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार, 15 दिवसानंतर शिंगे याच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, शिंगे याने पोलिस कर्मचारी असूनही महिलेस जबर मारहाण केली, हा गंभीर प्रकार असल्यामुळे त्याचे निलंबन करण्यात येत असल्याचा आदेश पोलिस उपायुक्त डॉ.नारनवरे यांनी दिला. मात्र अजूनही शिंगे यास पोलिसांनी अटक केलेली नाही.

'महिलेस मारहाणीच्या घटनेच्या चौकशीसाठी सहाय्यक पोलिस आयुक्तांना सुचना देण्यात आल्या होत्या. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन राहूल शिंगे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्याचे निलंबन करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी चर्चा करुन संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध पुढील कारवाई लवकरच केली जाईल.'

- डॉ. प्रियांका नारनवरे