
Pune Rain : महंमदवाडीतील डी मार्ट रस्त्यावरील पाण्यात कार गेली वाहून
उंड्री : महंमदवाडीतील डी मार्ट रस्त्यावरील पाण्याच्या लोंढ्यात कार पाण्यात वाहून गेली, तर कडनगर संस्कृती स्कूलजवळील रस्त्यावर टेम्पो वाहून जाताना नागरिकांनी बाहेर काढला. भिंताडेनगर-संस्कृती स्कूलजवळ पुल उभारावा, अशी मागणी वारंवार केली. मात्र पालिका प्रशासनाने अद्याप गांभीर्याने घेतले नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली.
उंड्री, पिसोळी, होळकरवाडी, हांडेवाडी, औताडेवाडी, महंमदवाडी, सय्यदनगर परिसरामध्ये सोमवारी (दि. 17 ऑक्टोबर, 2022) रात्री नऊ वाजल्यापासून पहाटे दोनपर्यंत पावसाने हाहाकार उडवून दिला. रस्ते पाण्याखाली गेले, हिल्स अँड डिल्स सोसायटीसह अनेक सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरल्याने गाड्या पाण्यात तरंगत होत्या. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या या धुवाधार पावसाने नागरिकांना अक्षरश: धडकी भरवली. रात्री साडेनऊच्या सुमारास सुरू झालेला पाऊस पहाटे दोनपर्यंत सुरू होता.
कात्रज बाह्यवळण मार्गावर उन्नती सोसायटीसमोरील रस्ता, पिसोळीतील धर्मावत पेट्रोलपंपामागील रस्ता, उंड्रीतील कडनगर चौक-संस्कृती स्कूल, हिलग्रीन स्कूल दरम्यानच्या रस्त्यावर दोन-अडीच फूट पाणी साचल्याने वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले. पावसाच्या पाण्याच्या दाबाने रस्त्याचे डांबर उखडले, स्त्याच्या साईडपट्ट्या वाहून गेल्या. पावसाचे टपोरे थेंब होते त्यामुळे पाऊस आणि पाण्याचा लोट रस्त्याने काही वेळातच वाहू लागला. तासाभरात शहरातील जवळपास सर्व रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे दुचाकीच नव्हे, तर चारचाकी चालकांनाही कसरत करावी लागली. पाऊस सुरू होताना घराबाहेर असलेले नागरिक विविध ठिकाणी अडकून पडल्याने प्रचंड हाल झाले. सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे हाल झाल्याचे नागरिकांची सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग विभागाने बाह्य वळण मार्गावर पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी, तसेच महापालिका प्रशासनाने समाविष्ट गावात पावसाळी वाहिन्यांची उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांच्या वतीने रोहन फडतरे-पाटील, राजेंद्र भिंताडे यांनी केली.