Pune Rain : बारामती तालुक्यात कऱ्हा नदीला पूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Rain

Pune Rain : बारामती तालुक्यात कऱ्हा नदीला पूर

बारामती : नाझरे धरण परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण भरून वाहू लागल्यामुळे कऱ्हा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे.त्याचा परिणाम म्हणून बारामती तालुक्यात नदीला मोठा पूर आला आहे. या पुरामुळे नदीकाठच्या गावातील अनेक घरांना फटका बसला असून या घरातील नागरिकांचे स्थलांतर करण्याचे काम काल रात्रीपासूनच प्रशासनाने सुरू केले होते.

उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुकध्यक्ष संभाजी होळकर यांच्यासह अनेकांनी बारामती तालुक्यात नदीपात्राच्या कडेला असलेल्या अनेक गावांमध्ये फिरून नागरिकांचे स्थलांतर व मदत कार्याचा आढावा घेतला.दरम्यान जळगाव कडेपठार ते काऱ्हाटी दरम्यान रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे बारामती पुणे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. कऱ्हा वागज, अंजनगाव, गुणवडी यासह बारामती शहरातील पंचशील नगर व इतर ठिकाणच्या आणि कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर प्रशासनाने सुरू केले आहे.

धरणातून सोडणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढल्यास नदीला अधिक पाणी येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाच्या वतीने आता तयारी सुरू केली असल्याची माहिती दादासाहेब कांबळे यांनी दिली. पोलीस प्रशासनही या स्थितीला हाताळण्याच्या दृष्टीने सज्ज आहे.

गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसाने बारामती तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचून राहिल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

बारामती शहर परिसरात देखील रात्रभर मोठा पाऊस झाला सध्या पावसाने बारामतीच्या व्यापार पेठेवरही विपरीत परिणाम होत आहे. दिवाळीच्या तोंडावर होत असलेल्या मुसळधार पावसामुळे व्यापारी आता चिंताग्रस्त आहेत.