esakal | पुण्यात पावसाची अचानक हजेरी; कडकडाटासह गारांची बरसात

बोलून बातमी शोधा

पुण्यात पावसाची अचानक हजेरी; कडकडाटासह गारांची बरसात

पुण्यात पावसाची अचानक हजेरी; कडकडाटासह गारांची बरसात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : पुणे शहर आणि उपनगर भागात आज ढगांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आलेला पहायला मिळाला. काही ठिकाणी गारांचा मारा देखील झाल्याचे चित्र अनुभवास मिळाले. बाणेर, बालेवाडी, वाकड, आंबेगाव, दत्तनगर, जांभूळवाडी, कोळेवाडी, रामटेकडी, सहकारनगर, पद्मावती, धनकवडी, सातारा रस्ता परिसर, कोथरूड, विश्रांतवाडी अशा बहुतांश परिसरात आज पावसाच्या सरींचा आनंद पुणेकरांना मिळाला. कालच्याप्रमाणे कोंढवे, शिवणे, उत्तमनगर परिसरात किरकोळ प्रमाणात गारा पडत किरकोळ पाऊस झाला.

पुण्यात आज सकाळ पासूनच खूप उकाडा जाणवत होता. दुपारी चारच्या सुमारास आकाशात ढग जमायला लागले आणि साडेचारच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पाऊस पडत असताना मधूनच एखादी गार पडू लागली, जसा पावसाचा जोर वाढला तशा गारांचा ही जोर वाढला. लहान बोरांच्या आकाराच्या गारा पडू लागल्या. सध्या लॉकडाऊन सुरु असल्यामुळे अचानक आलेल्या या पावसामुळे फार धांदल उडालेली पहायला मिळाली नाही. आधीपासूनच घरात असलेल्या बहुतांश पुणेकरांची तशी गैरसोय या पावसाने केल्याचं दिसून आलं नाही. पुणेकरांनी घरी बसूनच या पावसाचा आनंद घेतला.

हेही वाचा: भयानक! जगाच्या 38 टक्के कोरोना रुग्ण एकट्या भारतात

लहान मुले मोठी माणसं ही पावसात गारा वेचण्याचा आनंद घेतानाचे विहंगम दृष्य ठिकठिकाणी पहायला मिळाले. प्रत्येक जण कुठे किती गारा पडल्या आहेत हे घरातील मंडळींना मोठया उत्साहाने दाखवत होते. अंगाला गारा लागत असूनही सगळे गारा जमा करत होते. तर लहान मुले मी या गारा खाऊ शकते का असा एकच प्रश्न विचारत होते. तसेच खूप वर्षांनी या भागात गारांचा पाऊस पडल्याने सगळ्यांनाच याचे फार कौतुक वाटतं होते. अनेक जणांनी आपल्या सोशल मीडिया व्हाट्सअप वर पावसाचे, गारा भांड्यात जमा केल्याचे स्टेटस ही अपडेट केले आहे.