
Pune Rain : कात्रज बाह्यवळण मार्गावर पाण्यातून वाहनचालकांची कसरत
उंड्री : कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर कोंढव्यातील उन्नती सोसायटीसमोर पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने वाहनचालकांना पाण्यातून कसरत करावी लागत आहे. येवलेवाडी परिसरातून वाहत येणारे पावसाचे पाणी येथून जाण्यासाठी पूर्वी पाईप होते. मात्र, राडारोडा टाकल्याने ते बुजले असल्याने पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
बाह्यवळण मार्गावर उन्नती सोसायटीसमोर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, रात्री-अपरात्री चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत आहे. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक, महिलांना पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. पालिका प्रशासनाने तातडीने उपायोजना करावी.
प्रतिभा पाटील, कोंढवा
येवलेवाडी परिसरातून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पाईप होते. मात्र, काही बांधकाम व्यावसायिकांनी राडारोडा टाकल्याने पाईप गाळाने भरल्याने पाणी रस्त्यावरून वाहत आहे. अवजड वाहनांसह इतरही वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळे पुल उभारावा किंवा पाईपमधील गाळ काढून पाणी जाण्याची व्यवस्था करावी.
रोहन सुरवसे-पाटील, उंड्री
पालिकेच्या रस्ते विभागाने तातडीने पावसाचे आणि सोसायटीच्या चेंबरमधून पाणी रस्त्यावर येणार नाही, यासाठी तातडीने उपाययोजना करावी. पादचाऱ्यांना दुर्गंधीयुक्त पाण्यातून ये-जा करावी लागते. पालिकेने तातडीने चेंबर आणि पाईपची दुरुस्ती करावी.
-विजय मरड, येवलेवाडी
दरम्यान, पालिकेचे सहायक अभियंता व्ही.जी. कुलकर्णी म्हणाले की, रस्त्याची पाहणी करून तातडीने कार्यवाही केली जाईल.