
Pune Rain : प्रलयकारी पावसाने प्रशासनाला खडबडून जाग; पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
पुण्यामध्ये काल प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. या पावसामध्ये पुणेकरांचे अक्षरशः हाल झाले. अनेकांच्या घरात पाणी शिरलं, पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पुणे रेल्वे स्टेशनमध्येही पाणी शिरलं होतं. या परिस्थितीची दखल घेत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता चौकशीचे आदेश दिले आहे.
काल पुण्यात झालेल्या पावसाने पुणेकर हैराण झाले आहेत. या पावसाविषयी बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, "काल पुण्यामध्ये पाऊस झाला, ढगफुटी झाली. सकाळी सगळ्या परिस्थितीचा आम्ही आढावा घेतला आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिसांशी माझं बोलणं झालं आहे. मी अधिकाऱ्यांशी बोलत आहे."
आपण चौकशीचे आदेश दिले असल्याचं सांगताना चंद्रकांत पाटील म्हणाले, "मी अधिकाऱ्यांशी सध्या बोलत आहे. कालचा पाऊस नेहमीपेक्षा खूप जास्त होता. नियोजन बैठकीत चर्चा झाली आहे. मी आदेश दिले आहेत. पाण्याचा निचरा का होत नाही, पावसाचे पाणी वाहून नेणारी पाईपलाईन चोकअप झाली आहे का? याची चौकशी केली जाईल."