पुणे : राम नदीचा झाला नाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : राम नदीचा झाला नाला

पुणे : राम नदीचा झाला नाला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे (बावधन)  ः सरकारी आदेशाला पायदळी तुडवत बांधकाम व्यावसायिकांच्या अतिक्रमणामुळे बावधनमध्ये राम नदीचा अक्षरशः नाला झाला आहे. बेफिकीरपणे टाकलेला कचरा, वाहत असलेल्या सांडपाण्यामुळे नदीला गटारगंगेचे स्वरूप आले आहे. एकीकडे रेसिडेन्शियल डेस्टिनेशन होत असलेल्या बावधनमध्ये ‘राम तेरी नदी मैली हो गई’ असे किळसवाणे रूप सध्या रामनदीचे झाले आहे.

भुकूमपासून बावधनमार्गे सुतारवाडी पाषाणला वाहणारी रामनदी पूर्णपणे अतिक्रमणांच्या विळख्यात अडकली आहे. भूगाव, बावधनला बांधकाम व्यावसायिकांनी या नदीचा अक्षरशः गळा घोटला आहे. अतिक्रमणांमुळे या नदीचा भूगावला ओढा आणि बावधनला तर अक्षरशः नाला झाला आहे. रामनदीची मूळ रुंदी सुमारे शंभर फूट होती. परंतु अतिक्रमणांमुळे ती आता वीस फुटांवर आली असून, तिचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. या ठिकाणी इमारती बांधताना रामनदीच्या पात्रापासून १५ मीटर अंतरावरील सेटबॅक लाइनमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करायचे नाही, असा जिल्हाधिकाऱ्यांचा लेखी आदेश असतानाही त्याला हरताळ फासण्याचे काम बांधकाम व्यावसायिक मंडळींनी केले आहे.

इमारतींचे सांडपाणी थेट नदीत

सध्या नदी पात्राच्याकडेला ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहे. महामार्गाच्या पुलाजवळ छोटा बंधारा बांधला आहे. या ठिकाणी महिलांना धुणी धुण्याचे काम, जनावरांच्या स्वच्छतेचे काम व्यवस्थित व्हावे, यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. परंतु या पायऱ्यांवर कचऱ्याच्या ढिगांमुळे पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिली नाही. विविध प्रकारचा कचरा पाण्यात मिसळल्याने पाणी दूषित झाले आहे. तसेच इमारतीतील सांडपाणी सर्रासपणे नदीपात्रात सोडले जात आहे. हेच पाणी बावधन, सोमश्वरवाडी, पाषाणच्या नागरिकांच्या पिण्यासाठी वापरले जाते. काही ठिकाणी नदीतील ड्रेनेज पाइपलाइनही फुटली आहे.

हेही वाचा: आझाद मैदानात आंदोलक संतप्त; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

"बांधकाम व्यावसायिकांनी सरकारी आदेशाला धुडकावत राम नदीत बेसुमार अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणांवर अंकुश ठेवण्याबाबत अधिकाऱ्यांनीही डोळ्यावर पट्टी बांधली आहे. उलट स्थानिकांनी नदी किनारीच स्वतःच्या जागेत बांधकाम केल्यास त्यांना नोटिसा दिल्या जातात. मात्र बांधकाम व्यावसायिकांना जाणीवपूर्वक पाठीशी घातले जाते. याबाबत अनेकवेळा तक्रारीही केल्या आहेत. तसेच जनहित याचिकाही दाखल केली आहे."

- बबनराव दगडेपाटील, माजी सरपंच, बावधन बुद्रुक

"कचरा गोळा करण्यासाठी गाडी येते. परंतु नोकरदार, व्यावसायिक लोकांची वेळ आणि कचरागाडीची वेळ याचा मेळ बसत नाही. महापालिकेने ठिकठिकाणी कचरापेट्या ठेवल्यास वेळेनुसार पेटीतच कचरा टाकतील. ती पेटीही भरल्यानंतर महापालिकेने वेळेत घेऊन जाणे गरजेचे आहे."

- शैलेंद्र पटेल, रहिवाशी

loading image
go to top