
Pune : रांजणगाव जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार
शिरूर : पुणे - नगर रस्त्यावर रांजणगाव गणपती (ता. शिरूर) जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार झाला. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रांजणगाव गणपती, करंजावणे, खंडाळे, बाभुळसर खुर्द परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असून, मृत बिबट्यालाही या परिसरात पिल्लांसह पाहिल्याचा दावा काही स्थानिक तरूणांनी केला.
या परिसरातील बिबट्याच्या बंदोबस्तासाठी परिसरात पिंजरे लावण्याची मागणीही स्थानिक ग्रामस्थ व ग्रामपंचायतीकडून करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर रांजणगावजवळ हॉटेल राजयोग नजीक आज सकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळला. रांजणगाव एमआयडीसीतील कंपनीत रात्रपाळीला कामाला असलेल्या कामगारांनी कामावरून घरी जाताना
हा मृत बिबट्या पाहिला व याबाबत वनखात्याला माहिती दिल्यानंतर वनरक्षक सविता चव्हाण यांनी रेस्क्यू मेंबर हनुमंत कारकूड व आनंदा शेवाळे यांच्यासह तातडीने घटनास्थळी भेट दिली. तोंडाला व डोक्याला मार लागल्याने रक्तस्त्राव होऊन बिबट्याचा मृत्यु झाला होता. रेस्क्यू पथकाने स्थानिकांच्या मदतीने या बिबट्याला शिरूरच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात आणले. तेथे शवविच्छेदन करून बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वाहनाच्या धडकेने मृत्युमूखी पडलेला हा मादी बिबट्या सहा ते सात वर्षांचा असून, पूर्ण वाढ झालेला होता, अशी माहिती शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली. या मादी बिबट्यासोबत पिल्लेही होती, अशी माहिती स्थानिकांनी दिली असली तरी वनखात्याने या शक्यतेला दूजोरा दिलेला नाही. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रेस्क्यू टीममार्फत परिसरात पाहणी केली जाईल, असे म्हसेकर यांनी सांगितले.