esakal | पुणेकरांनी मिळकतकरापोटी भरले १७१ कोटी

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation
पुणेकरांनी मिळकतकरापोटी भरले १७१ कोटी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा पुणेकर महापालिकेच्या पाठीशी उभे राहिले असल्याचे समोर आले आहे. २८ दिवसांत पुणेकरांनी मिळकत कराच्या रूपातून महापालिकेच्या तिजोरीत तब्बल १७१ कोटी रुपयांचा भरणा केला आहे. गेल्यावर्षी याच कालवधीत ८७.१६ कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळकत करातून मिळाले होते. आर्थिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतरच्या अवघ्या २८ दिवसांत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट मिळकत जमा झाला आहे.

गेल्या वर्षी नऊ मार्च रोजी पुणे शहरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्यानंतर बाधितांची संख्या वाढू लागल्याने २३ मार्च देशभरात लॉकडाउन लागू झाला. एप्रिलपासून महापालिकेचे आर्थिक वर्ष सुरू होते. गेल्या वर्षी १ एप्रिल ते २८ एप्रिल या दरम्यान केवळ ९४ हजार ४८२ मिळकतदारांनी केवळ ८७.१६ कोटी रुपये कर भरला होता. यावर्षी मात्र याच कालवधीत तब्बल १ लाख ५८ हजर ३२५ मिळकतदारांनी १७१.०५ कोटी रुपयांचा मिळकत कर भरला असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालवधीत ४ लाख ७७ हजार ८४३ मिळकतदारांनी ४३४.१९ कोटी रुपये कर भरला होता.

हेही वाचा: Pune Corona Update: कालच्यापेक्षा आज अधिक रुग्ण; दगावणाऱ्यांची संख्याही वाढली

  • १२ लाख - शहरातील एकूण मिळकतींची संख्या

  • ४ लाख ६२ हजार ७७६ - १५ टक्के सवलतीस प्राप्त असलेल्या मिळकतींची संख्या

  • १ लाख ५८ हजार ३२५ - १ एप्रिलपासून आजपर्यंत मिळकत कर भरलेल्या मिळकतदारांची संख्या

  • १७१ कोटी ५ लाख - आतापर्यंत मिळकतकरातून मिळालेला महसूल

हे लक्षात ठेवा

  • ३० मे अखेरपर्यंत चालू वर्षीचा मिळकत भरल्यानंतर सरकारचे कर वगळता अन्य सर्व करांवर १५ टक्के सवलत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे

  • त्यामुळेच २८ दिवसांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मिळकतकर भरून सवलतीचा फायदा घेतला

  • सवलतीचा फायदा घेण्यासाठी नागरिकांनी ३० मेपूर्वी मिळकतकराचा भरणा करावा

कोरोनाच्या काळातही मुदतीत मिळकतकर भरून महापालिकेला सहकार्य करणाऱ्या मिळकतदारांना चालू वर्षीच्या मिळकतकराच्या बिलात सरकारचे कर वगळून १५ टक्क्यांची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला असून, ३० मे पूर्वी अधिकाधिक मिळकतदारांनी कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा.

- विलास कानडे, कर आकारणी व कर संकलन प्रमुख