

Police have registered separate FIRs in the respective police stations and launched investigations into all the incidents.
Sakal
कोथरूड, खडक परिसरातील अपघातांत तिघेजण जखमी
पुणे : शहरात घोरपडे पेठ आणि केळेवाडी परिसरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले. याबाबत कोथरूड आणि खडक पोलिस ठाण्यात संबंधित चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडक परिसरात घोरपडे पेठेत फिर्यादी सादिक साबीर खान (वय २८, रा. गणेश पेठ) हा तरुण रस्त्याच्या कडेला दुचाकीवर बसून मित्राशी गप्पा मारत होता. त्यावेळी मद्यधुंद रिक्षाचालक रामसिंग राजाराम यादव (वय ४०, रा. बिबवेवाडी) याने त्याला पाठीमागून धडक दिली. या अपघातात फिर्यादी आणि रिक्षाचालक हे दोघेही जखमी झाले. अपघातानंतर पसार झालेल्या रिक्षाचालकावर खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अन्य एका घटनेत रमाकांत कंटिराम गर्जे (वय २८, रा. केळेवाडी) हे त्यांच्या पत्नी आणि मुलासह दुचाकीवरून जात होते. कोथरूडमधील केळेवाडी सिग्नलजवळ भरधाव डंपर चालकाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात फिर्यादी आणि त्यांची पत्नी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर चालक चंद्रकांत महादेव म्हस्के (वय ३२, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) हा डंपर सोडून पळून गेला. कोथरूड पोलिसांनी या डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.