Pune: रस्त्यांची दुरावस्था अन् फक्त दीड कोटीचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यांची दुरावस्था

पुणे : रस्त्यांची दुरावस्था अन् फक्त दीड कोटीचा दंड

पुणे : शहरात समान पाणी पुरवठ्याच्या कामासाठी ठेकेदाराकडून रस्ते खोदाई सुरू असताना येथे सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जात नाहीच, शिवाय काम झाल्यानंतर व्यवस्थित खड्डे बुजविले जात नाहीत. रस्त्यांची चाळण होत आहेत. तरीही महापालिका प्रशासन या ठेकेदारावर मेहरबान आहे. चुकीच्या पद्धतीने काम झाले तर त्यावर दंडात्मक कारवाई करणे अपेक्षीत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागासह सर्वच रस्त्यांची वाट लागलेली असताना केवळ १ कोटी ९० लाख ३३ हजार ४८६ रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

पुणे शहराची लोकसंख्या वाढत असताना दरवर्षी पाण्याचा वापर देखील वाढत आहे. पण वितरण व्यवस्थेतील गोंधळामुळे काही भागात दिवसभर तर काही भागात अवघे अर्धा ते एक तास असा असमान पाणी पुरवठा होत आहे. शिवाय जलवाहिन्यांमधून ४० टक्के पाणी गळती होऊन वाया जात आहे. महापालिकेने मीटर बसवलेले नसल्याने नेमके कोणत्या भागात किती पाणी जाते, कुठे जास्त वापर होत आहे याचा हिशोब लागत नाही. यासाठी महापालिकेने २१०० कोटी रुपयांची ‘समान पाणी पुरवठा योजना’ राबविण्यास सुरवात केली.

हेही वाचा: पुणे : बहुसदस्यीय वॉर्ड पद्धतीबाबत म्हणणे सादर करा

महापालिकेने या योजनेसाठी १७०० किलोमीटर लांबीची जलवाहिन्या शहरात टाकण्याचे ‘एल अँड टी’ कंपनीला दिला आहे. आत्तापर्यंत सुमारे ५३० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, आत्तापर्यंत झालेल्या कामाबाबत नागरिक, नगरसेवक यांच्या अनेक तक्रारी महापालिकेकडे आलेल्या आहेत. रस्ते खोदाई करताना बॅरिगेट लावून, कामाची माहिती देणारा फलक लावणे आवश्‍यक आहे, पण ही माहिती दिली जात नाही. रस्ता खोदून जलवाहिनी टाकल्यानंतर त्यावर माती ऐवजी खडी टाकून सिमेंट कॉंक्रिटने रस्ता दुरुस्त करणे आवश्‍यक आहे. पण सध्या काही ठिकाणी फक्त माती टाकली जात आहे. तर काही ठिकाणी खडी कमी टाकून त्यावर सिमेंट टाकले जात आहे. त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे होऊन काही दिवसांनी सिमेंट काँक्रिट टाकलेला रस्ता खचत आहे. ५३० किलोमीटरच्या खोदकामात नागरिकांना हाच त्रास प्रकर्षाने जाणवत आहे.

महापालिकेने ज्या भागात चुकीच्या पद्धतीने काम केले आहे, त्यासाठी ‘एल अँड टी’वर दंडात्मक कारवाई केलेली आहे. गेल्या दोन वर्षात साडे पाचशे कोटी रुपयाचे कामे झाले असून, चुकीच्या कामाबद्दल १ कोटी ९० लाख ३३ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही रक्कम कंपनीच्या बिलातून वसूल केली जाईल, असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

हेही वाचा: पुणे : मुख्याध्यापकांचे राज्यस्तरीय अधिवेशन गुरुवारपासून

आयुक्तांनी व्यक्त केली नाराजी

पाणी पुरवठ्याच्या कामामुळे शहराच्या

मध्यवर्ती भागात खड्डे पडले आहेत. रस्ते व्यवस्थित बुजविले गेले नाहीत, रस्‍त्यांची लेव्हल बिघडलेली आहे. त्यामुळे अपघात होत आहेत. आयुक्त विक्रम कुमार यांनी नुकतीच रस्त्यांची पाहणी केली, त्यावेळी तेथील ‘एल अँड टी’ कंपनीच्या अधिकाऱ्याला हे काम बरोबर होत नसल्याने सांगत नाराजी व्यक्त केली होती.

असा झाला दंड

पॅकेज एक पर्वती झोन - ६१.१२ लाख

पॅकेज दोन भामा आसखेड झोन - २३.२२ लाख

पॅकेज तीन वारजे झोन - ३०.१ लाख

पॅकेज चार वडगाव झोन - १.३१ लाख

पॅकेज पाच मुख्य वितरण नलिका टाकणे - ७३.२५ लाख

एकूण दंड - १.९० कोटी

loading image
go to top