रस्त्यांची झाली चाळणी; पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कामांचा दर्जा उघड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Road

पाच-सहा दिवस पाऊस काय पडला अन् शहरातील रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचे दर्शन होण्यास सुरुवात झाली आहे.

रस्त्यांची झाली चाळणी; पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कामांचा दर्जा उघड

पुणे - पाच-सहा दिवस पाऊस काय पडला अन् शहरातील रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचे दर्शन होण्यास सुरुवात झाली आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वी जेथे डांबरीकरण केले होते, त्यावरील खडी निघून जात आहे. रस्त्याच्या मध्यभागी खड्डे पडून त्यांत पाणी भरत असल्याने वाहनचालकांची तारांबळ उडत आहे, तर रस्ते खोदल्यानंतर सिमेंट काँक्रिट टाकून खड्डे बुजविण्यात आले. पण त्यावरही खड्डे पडल्याने रस्ते धोकादायक झाले आहेत. यापुढील तीन महिने पावसाळा असल्याने रस्त्यांची स्थिती यापेक्षा भयंकर होण्याची चिन्हे आहेत.

शहरात गेल्या वर्षभरापासून जलवाहिनी, मलवाहिनी टाकण्यासाठी शेकडो किलोमीटरचे रस्ते खोदण्यात आले. मोबाईल, इंटरनेट कंपन्यांच्या केबल, विद्युतवाहिनी टाकण्यासाठीही मोठ्या प्रमाणात रस्ते खोदण्यात आले. एकाचवेळी शहराच्या सर्व भागांत सुरू असलेल्या खोदकामामुळे एकही रस्ता धड राहिला नाही. मध्यवर्ती पेठांसह उपनगरांमधील नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका आयुक्तांनी पावसाळ्यापूर्वी रस्ते खोदाई थांबवून सर्व रस्ते पूर्ववत करा, असे आदेश पथ विभागाला दिले. पाणीपुरवठा विभागाकडून जेथे जलवाहिनी टाकली जाते, तेथे त्यांच्याकडूनच रस्ता दुरुस्त केला जातो. पण हे काम करताना पाणीपुरवठा विभाग व पथ विभाग यांच्यामध्ये समन्वय नव्हता. पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनी टाकल्यानंतर त्या कामात दर्जा नसल्याने अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रिट टाकलेला भाग खचला आहे, तर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत.

नदीपात्र, बंडगार्डन रस्ता, सिंहगड रस्ता, चतुःश्रृंगी, रेंजहिल कॉर्नर, खडकी स्टेशन, ब्रेमेन चौक, सेनापती बापट रस्ता, वडारवाडी, निलज्योती, येरवडा, खराडी, कात्रज-कोंढवा रस्ता, बिबवेवाडी, हडपसर, वानवडी, धायरी, कोरेगाव पार्क, सोलापूर रस्ता, मुंढवा रस्ता यांसह इतर भागांत मुख्य रस्त्यासह लहान रस्त्यांना खड्डे पडले आहेत. तर अनेक ठिकाणी हळूहळू खडी निघून खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात शहरातील रस्ते खड्ड्यात जाणार हे नक्की!

  • १४०० किमी - शहरातील रस्त्यांची एकूण लांबी

  • ९०० किमी - डांबरी रस्ते

  • ४०० किमी - काँक्रिटचे रस्ते

  • १०० किमी - विकसित न झालेले रस्ते

  • १३ कोटी - देखभाल, दुरुस्ती खर्च (वार्षिक)

रस्ते समपातळीत नसल्याने साचते पाणी

रस्त्यांची लेव्हल बिघडल्याने रस्त्यावर पडलेले पावसाचे पाणी वाहून न जाता ते रस्त्यावर थांबण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे डांबरी रस्त्यांना खड्डे पडण्याचा धोका वाढला आहे. अनेक ठिकाणी पावसाळी गटारांचे चेंबर रस्त्यापासून उंच असल्याने त्यात पाणी जाऊ शकत नसल्याने चेंबरभोवती पाणी साचते. निकृष्ट पद्धतीने काम केल्याने याचा त्रास नागरिकांना भोगावा लागत आहे.

Web Title: Pune Roads Sieved Quality Work Revealed At The Beginning Of The Rainy Season

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punerainDamage road