
Pune Crime : दरोडा टाकणाऱ्या टोळीतील पाच जणांवर मोकाची कारवाई
पुणे - हडपसर परिसरातील दरोड्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी टोळीप्रमुख पंकज वाघमारे याच्यासह पाचजणांविरुध्द संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश दिले होते.
पंकज ऊर्फ पंक्या गोरख वाघमारे (वय २४, रा. गाडीतळ, हडपसर), स्वप्नील ऊर्फ बिट्या संजय कुचेकर (वय २२, रा. मांजरी, ता. हवेली), राहुलसिंग रवींद्रसिंग भोंड (वय १८, रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर), आकाश ऊर्फ आक्या गोविंद शेंडगे (वय २०, रा. मांजरी बुद्रूक) आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या पाचजणांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे. तर, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
टोळीप्रमुख पंकज वाघमारे आणि त्याचे इतर चार साथीदार हे २५ डिसेंबर रोजी फिर्यादीच्या घरात घुसले. त्यांनी फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावून ‘आवाज मत करो, नहीं तो जान से मार दूँगा. तुम्हारे पास जो कुछ हैं, वो चुपचाप निकाल के दे दो’ असे बोलून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादीचा मोबाईल आणि रोख रक्कम चोरी करुन घेऊन गेले. याबाबत फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर पाचजणांवर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आरोपींच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, दरोडा, गंभीर दुखापत करणे, प्राणघातक हत्यारे बाळगणे, नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे, मालमत्तेचे नुकसान अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
यासंदर्भात हडपसर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार पोलिस उपायुक्त यांच्यामार्फत अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजन शर्मा यांच्याकडे मोकाचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रकरणाची छाननी करून प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई करीत आहेत.