
राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी गेले वर्ष कार्यविस्ताराच्या दृष्टीने सकारात्मक ठरले आहे. गेल्या वर्षभरात संघाच्या देशभरात आठ हजार शाखा नव्याने सुरू झाल्या आहेत.
RSS : रा. स्व. संघाच्या कार्यविस्तारासाठी गतवर्ष ठरले महत्त्वाचे - प्रा. सुरेश जाधव
पुणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी गेले वर्ष कार्यविस्ताराच्या दृष्टीने सकारात्मक ठरले आहे. गेल्या वर्षभरात संघाच्या देशभरात आठ हजार शाखा नव्याने सुरू झाल्या आहेत. येत्या दोन वर्षात पश्चिम महाराष्ट्र प्रांतात अधिक जोमाने कामाचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक प्रा. सुरेश जाधव यांनी दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १२ ते १४ मार्च दरम्यान समलखा (पानिपत) येथे झाली. प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील सद्य स्थितीची माहिती देण्यासाठी बुधवारी (ता. १५) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले, विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. सद्यःस्थितीत संघाच्या देशभरात ४२ हजार ६९३ स्थानी ६८ हजार ६५१ शाखा सुरू आहेत. मागील वर्षी मार्चमध्ये ३७ हजार ९०३ स्थानी ६० हजार ११७ शाखा होत्या. एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान देशभरात एकूण तीन हजार ६८५ संघ शिक्षा वर्ग पार पडले, असे जाधव यांनी सांगितले.
अशी आहे पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील स्थिती -
संघाच्या विविध वर्गामधून पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील सहभागी स्वयंसेवकांची संख्या तीन हजार ३४१ आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रांतात २६५ स्थानी ६८३ शाखा आहेत. प्रांतात पुणे, नाशिक आणि कोल्हापूर असे तीन विभाग असून त्यात १९२ विद्यार्थी, २३ महाविद्यालयीन, १२७ तरुण व्यवसायी आणि प्रौढांच्या १६९ शाखा आहेत. पुणे महानगरात ४९ स्थानी २७२ शाखा आहेत. यामध्ये १११ बालकांच्या, ४ महाविद्यालयीन तरुणाच्या, ११५ विद्यार्थी तर ५४ तरुण व्यवसायी आणि १०३ प्रौढांच्या शाखा आहेत.
या पाच बाबींवर लक्ष केंद्रित करणार -
- सामाजिक समरसता
- कुटुंब प्रबोधन
- पर्यावरण संरक्षण
- स्वदेशी आचरण
- नागरिक कर्तव्य