पुण्यात रूबी हॉल क्‍लिनिकमध्ये संतप्त नातेवाईकांकडून तोडफोड; बिलावरून वाद

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 16 January 2020

स्वादूपिंडाला सूज आल्याने उपचारासाठी रुग्णाला रूबी हॉल क्‍लिनिकमध्ये दाखल केले होते. महिन्याभरापासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण, त्याला रुग्ण प्रतिसाद देत नव्हता. अखेर गुरुवारी रुग्णाचा मृत्यू झाला.

पुणे : रूबी हॉल क्‍लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल तरुणाचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली. रुग्णालयातील बिलावरून वाद झाल्याने ही घटना घडली. रुग्णालयाच्या बिलावरून हा वाद झाला असून, रुग्णाच्या नातेवाईकांनी मृतदेह घेऊन जाण्यास नकार दिल्याने तो रुग्णालयाच्या शवागारात ठेवला आहे. विकी डोंगरे (वय 34, रा. वडारवाडी) असे मृत रुग्णाचे नाव आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'उपचारांसाठीचे 11 लाख परत करा'
स्वादूपिंडाला सूज आल्याने उपचारासाठी रुग्णाला रूबी हॉल क्‍लिनिकमध्ये दाखल केले होते. महिन्याभरापासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण, त्याला रुग्ण प्रतिसाद देत नव्हता. अखेर गुरुवारी रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाच्या उपचारासाठी मोठा खर्च आला होता. रुग्णाच्या नातेवाइकांची मुख्य नाराजी ही रुग्णालयातील खर्चाच्या संदर्भात होती. डॉक्‍टरांनी रुग्णाला दिलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल त्यांची कोणतीही तक्रार नव्हती. रुग्णाच्या उपचारासाठी झालेला सुमारे अकरा लाख रुपये परत करावे, अशी त्यांची मागणी होती. त्यासाठी रुग्णालयाने पिवळ्या शिधापत्रिकेची प्रत मागितली. पण, या कागदपत्रांची पूर्तता करण्याची नातेवाइकांची तयारी नव्हती. त्यातून वाद झाल्याने रुग्णाच्या नातेवाइकांनी रुग्णालयातील कुंड्यांची तोडफोड केली, अशी माहिती रूबी हॉल क्‍लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे यांनी दिली. तुमची तक्रार असेल तर पोलिस ठाण्यात तशी रीतसर तक्रार द्या असेही त्यांना सांगितले होते. मात्र, त्या बाबत कोणतीही तक्रार पोलिस किंवा धर्मादाय उपायुक्तालयात दाखल नसल्याचे सांगितले. 
रुग्णाच्या नातेवाइकांनी मृतदेह घेऊन जाण्यास नकार दिला. त्यामुळे संबंधित मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. घटनास्थळावर तातडीने पोलिस आले. मात्र, उशिरापर्यंत त्या संदर्भात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घटनेची नोंद इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये करण्यात आली आहे. दरम्यान, रुग्णाचा आजार मोठा होता. त्याच्यावर प्रदीर्घ उपचार सुरू होते. हे नातेवाइकांनी समजून घेतले पाहिजे. अशा घटनांचा थेट परिणाम इतर रुग्णांच्या उपचारांबरोबर डॉक्‍टरांच्या कार्यक्षमतेवर होतो.
- डॉ. अविनाश भोंडवे,  राज्य अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune ruby hall hospital patients relatives sabotage