सहकार सक्षमीकरणाची दिशा आणि नेत्यांना चिमटे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Shah

सकाळतर्फे आयोजित दोन दिवसांच्या सहकार आणि बॅकिंग परिषदेचा समारोप शहा यांच्या उपस्थितीत झाला.

Amit Shah : सहकार सक्षमीकरणाची दिशा आणि नेत्यांना चिमटे!

पुणे - गृहखात्याच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात लक्ष ठेवणारे आणि पक्षीय राजकारणही चाणाक्षपणे करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आगामी दशक सहकार सक्षमीकरणाचे असल्याची ग्वाही देत अन त्यासाठी केंद्र सरकार किती बारकाईने उपाययोजना करीत असल्याचे शनिवारी उलगडून दाखविले. त्यामुळे ‘सकाळ’ आयोजित सहकार आणि बॅंकिंग परिषदेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आणि सरकारची दिशाही समजली. यावेळी शहा यांनी सहकारातील अपप्रवृत्तींवरही बोट ठेवले आणि कोणाचाही नामोल्लेख न करता नेमके चिमटेही काढले!

सकाळतर्फे आयोजित दोन दिवसांच्या सहकार आणि बॅकिंग परिषदेचा समारोप शहा यांच्या उपस्थितीत झाला. सहकार खात्याचा कार्यभार घेतल्यापासून सहकार मंत्री म्हणून शहा यांचे पुण्यात पहिल्यांदाच भाषण होणार होते.

त्यामुळे उपस्थितांमध्ये त्याबद्दल कुतूहल होते. शहा यांना सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी भाषण सुरू केले आणि पुढील ३८ मिनिटे त्यांनी सगळ्यांना अक्षरशः खिळवून ठेवले. सहकार क्षेत्रात गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत असल्याचे सांगत, शहा यांनी सुरवात केली. सहकार क्षेत्रात या पूर्वी चुका काय झाल्या, केंद्र सरकारने त्यांचा विचार करून कोणत्या उपाययोजना केल्या, भविष्यातील नियोजन काय आहे, त्यातून शेतकऱ्यांना फायदा कसा होणार, त्याचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होणार आणि सहकार क्षेत्राची भरभराटीचे उद्दिष्ट साध्य कसे करणार, याचे विवेचन त्यांनी नेटकेपणाने मांडले. कधी उत्स्फूर्तपणे तर, कधी आकडेवारीसाठीच हातातील कागदांचा आधार घेत शहा यांना सहकार क्षेत्रासाठी केंद्र सरकार काय करीत आहे, हे संवाद साधत उलगडून दाखविले.

सहकार क्षेत्र हा ग्रामीण भारताचा पाया आहे आणि येत्या दहा वर्षांत तो भक्कम होणार असल्याची ग्वाही देताना शहा यांना सहकार क्षेत्रातील धुरिणांना आत्मचिंतन करण्याचा सल्ला आवर्जुन दिला. त्यासाठी राज्यात एकेकाळी सहकारी साखर कारखान्यांची संख्या जास्त होती, आता ती निम्म्यावर आली आहे आणि खासगी साखर कारखान्यांची संख्या दुपटीपेक्षा अधिक झाली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सहकारी बॅंकांना चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप केल्यामुळे राज्यातील अनेक सहकारी बॅंका रसतळाला गेल्या, हे सांगताना त्यांनी पुण्यातील रूपी सहकारी बॅंकेचाही दाखला दिला. संचालक मंडळातील काही प्रकारच्या व्यक्तिंमुळे बॅकांचेच नव्हे तर, सहकार खात्याचे नुकसान होत असल्याचे सांगताना त्यांनी कोणत्याही नेत्याचा नामोल्लेख करता, त्या व्यक्ती तुम्हाला माहिती आहेत, असे सांगितले. कार्यक्रमाच्या ठिकाणी नियोजीत वेळेपेक्षा पोचण्यास विलंब झाल्याचे लक्षात ठेवत शहा यांनी समारोप करताना आवर्जुन दिलगिरीही व्यक्त केली.

गृहमंत्री लोकांमध्ये शिरले

शहा केंद्रीय गृहमंत्री असल्यामुळे त्यांना झेड प्लस सुरक्षा आहे. समारोपाच्या वेळी ग्रूप फोटोसाठी उभे राहण्याची विनंती त्यांना कऱण्यात आली आहे. त्यावेळी ते व्यासपीठावरून खाली उतरले आणि थेट उपस्थितांमध्ये पोचले. सुरक्षिततेचे प्रोटोकॉल पोलिस सांभाळत असतानाही, शहा यांनी उसळलेल्या गर्दीतून कोणाचे निवेदन स्वीकारले तर, ज्यांनी-ज्यांनी हात पुढे केले आहे, त्यांचेही अभिवादन स्वीकारले. त्यावेळी अनेकजणांनी मोबाईलमधून सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला, त्यालाही शक्य तितका प्रतिसाद शहा यांनी दिला. केंद्रीय गृहमंत्री असलेली व्यक्ती थेट लोकांमध्ये मिसळते, ही बाब सहकार परिषदेत सहभागी झालेल्यांना भावल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून आले.

टॅग्स :Amit ShahpuneSakal