खडकवासल्यात बैलाची उभारली समाधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

खडकवासल्यात बैलाची उभारली समाधी

किरकटवाडी : ज्याला परिवारातील सदस्याप्रमाणे जीव लावला, जो त्याची उंची, आकर्षक शरीर यष्टी आणि पांढरा शुभ्र रंगामुळे बघणाऱ्यांच्या नजरेत भरत होता अशा लाडक्या ‘आमदार’ नावाच्या बैलाचे खडकवासला येथे निधन झाले. बैलप्रेमी निखिल कोरडे व शंभू-बाजी ग्रुपच्या सदस्यांनी या बैलाची खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला सिंहगड सृष्टी येथे असलेल्या गोठ्याच्या आवारात समाधी उभारली आहे. बैलाविषयी कृतज्ञता म्हणून अंत्यविधी, दशक्रिया विधी व तेराव्याचा विधीही करण्यात आला. या वेळी सर्व सदस्यांनी मुंडणदेखील केले.

खडकवासल्यातील शंभू-बाजी ग्रुपमधील सदस्य आपली नोकरी-व्यवसाय सांभाळत बैलांचे संगोपन करतात. त्यासाठी खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला त्यांच्या जागेत भव्य गोठा उभारण्यात आलेला आहे. सध्या तब्बल वीस लाख रुपये किमतीचे चार बैल त्यांच्या गोठ्यात आहेत.

हेही वाचा: झाडांना खिळे ठोकणाऱ्यांवर कारवाई करा’

दररोज स्वच्छ आंघोळ घालणे, उत्तम दर्जाचा हिरवा व वाळलेला चारा खाऊ घालणे, दिवसातून दोन वेळा खुराक चारणे आणि गोठ्याची स्वच्छता ठेवणे अशा गोष्टींमुळे शंभू-बाजी ग्रुपचे बैल बघ्यांच्या नजरेत भरतात. ‘आमदार’ हा बैल या ग्रुपने पाच वर्षांपूर्वी धायरी येथील एका शेतकऱ्याकडून पाच लाख एकावन्न हजार रुपयांना खरेदी केला होता. अत्यंत गरीब व देखण्या ‘आमदारा’ला लहान मुलेही धरून फिरवायची.

दुर्दैवाने नुकतेच या बैलाचे अचानक निधन झाले. अकाली सोडून गेलेल्या लाडक्या बैलाला गोठ्यातच पुरून त्या जागी त्याची समाधी उभारण्यात आली व त्यावर त्याचा आकर्षक पुतळा उभारण्यात आला. एवढेच नाही तर दशक्रिया व तेराव्याचा विधी करून सर्व ग्रुप सदस्यांनी मुंडण केले.

संत तुकारामांची पालखी ओढण्याचा मान

‘आमदारा’चे सौंदर्य व इतर गुणांमुळे त्याला २०१६ मध्ये संत तुकाराम महाराज यांची पालखी ओढण्याचा, तर २०१८ आणि २०१९ मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा रथ ओढण्याचा मान मिळाला होता.

दहा लाखांहून अधिकची बोली

महाराष्ट्रासह इतर राज्यांतील बैलप्रेमी या ‘आमदारा’ला दहा लाखांपेक्षा जास्त किमतीला खरेदी करण्यासाठी इच्छुक होते; परंतु परिवारातील सदस्याप्रमाणे आपुलकीचे नाते जडलेल्या लाडक्या आमदाराला कोणी कितीही किंमत दिली तरी विकायचे नाही, अशी भूमिका शंभू-बाजी ग्रुपच्या सदस्यांनी घेतली होती.

Web Title: Pune Samadhi Bull Erected Khadakwasala

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsFarmer