पुणे-सातारा रस्त्याची दुरवस्था; कात्रज ते भिलारेवाडीपर्यंत रस्त्याची चाळण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Satara Road Condititon

पुणे-सातारा रस्त्याची कात्रज ते भिलारेवाडीपर्यंत मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिक आणि वाहनचालक हैराण झाले आहेत.

पुणे-सातारा रस्त्याची दुरवस्था; कात्रज ते भिलारेवाडीपर्यंत रस्त्याची चाळण

कात्रज - पुणे-सातारा रस्त्याची कात्रज ते भिलारेवाडीपर्यंत मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिक आणि वाहनचालक हैराण झाले आहेत. रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली असून अपघातांच्या घटनेतही वाढ झाल्याचे दिसून येते. पुण्याचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार असलेल्या या परिसरात आणि महापालिका हद्दीत येऊनसुध्दा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

कात्रजच्या पुढे पीएमपीच्या डेपोजवळ रस्त्यांच्या मधोमध मोठा खड्डा पडला आहे. गंधर्व लान्सजवळ अर्धा फूट खोल खड्डा पडला असून दुरवस्था झाली आहे. याच मार्गावरील स्वागत हॉटेलसमोर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. माऊली रेस्टोरंट ते जोशी वडेवालेसमोरील रस्ता खडी उखडलेल्या अवस्थेत आहे. सातत्याने याकडे लक्ष वेधूनदेखील महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागांकडून कोणत्याही प्रकारची कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येत नाही.

या मुख्य रस्त्यातील खड्ड्याची पावसाळ्यात खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती. आता ही खडी उखडल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर तत्काळ उपायजोना करत रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालक आणि नागरिकांतून होत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता देवेन मोरे यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक

पुणे-सातारा रस्ता हा वाहकीसाठीचा मुख्य मार्ग असून मोठ्या प्रमाणांत रहदारी असते. तसेच, मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक असल्याने रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने होण्याची आवश्यकता असताना मात्र, थातूर मातूर काम केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे अनेकवेळा अपघात होतात.

प्रतिक्रिया

महापालिकेने चांगल्या पध्दतीने कात्रज ते भिलारवाडी या मुख्य रस्त्यातील धोकादायक खड्ड्याची तातडीने दुरुस्ती करावी. अन्यथा आता दिवाळीचे फटाके संपले असून नागरिकांच्या विरोधाचे फटाके वाजतील.

- आदित्य गायकवाड, वाहनचालक

सातारा रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, काहीही काम होत नाही. रस्त्यावरील खड्डे कधी बुजविलेच तरी त्याचा दर्जा अत्यंत असतो. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यांवर खडी पसरते. त्यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये आणखीनच वाढ होते.

- शुभम मांगडे, स्थानिक नागरिक

टॅग्स :SatarapunerouteBad Work