Pune : सावित्रीबाई फुलेंच्या शाळेची सुरुवातही सरस्वती देवीच्या पूजनाने' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal

Pune : सावित्रीबाई फुलेंच्या शाळेची सुरुवातही सरस्वती देवीच्या पूजनाने'

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शाळेत सरस्वती देवीचे फोटो लावण्याबाबत केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा आहे. सर्व शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो असावेत. फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची?, असे विधान भुजबळ यांनी केले होते. त्याला आता प्रख्यात कादंबरीकार विश्वास पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. अलीकडे राजकारणी लक्ष्मीच्या प्रेमात असतात. म्हणून त्यांना सरस्वती आवडत नाही, असा टोला पाटील यांनी भुजबळ यांचे नाव न घेता लगावला.

अभिनेता प्रसाद ओक लिखित माझा आनंद या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. ते म्हणाले, "यांना सरस्वतीचे महत्त्व माहितीच नाही. राजकीय लोकांना इतिहास भूगोल देखील माहित नाही. शाळेत पहिल्यांदा सरस्वतीची पूजा करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. तुम्हाला माहिती नसेल पण सावित्रीबाई फुले यांनी देखील सरस्वतीची उपासना केली होती. त्यांच्या शाळेची सुरुवात सरस्वती देवीच्या पूजनाने होत असे. त्यावेळी महात्मा फुले तेथे उभे असत."

सावित्रीबाई फुले यांच्या काव्य फुले या पुस्तकाचा दाखलाही पाटील यांनी दिला. ''सावित्रीबाई फुले यांच्या काव्यफुले या कवितासंग्रहात ३१ व्या पानावर सरस्वती देवीच्या स्तुतीची कविता आहे. या कवितेत 'सरस्वतीच्या दरबारात शिक्षण घेणेस जाऊ चला, विद्यादेवीस प्रसन्न करूनी वर मागू चला', अशा ओळी आहेत. हे आपल्याला माहित नाही. इतकी बौद्धिक पातळी खाली आली आहे. माणसे गरीब असतात, कारण त्यांच्याकडे लक्ष्मी नसते. गरीब माणसांना आधार विद्येचा व कलेचा असतो, म्हणजेच सरस्वतीचा असतो. त्यामुळे सरस्वतीचा अपमान हा या देशातील गरीबीचा अपमान आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आजच्या भाषेत बोलायचे झाले, तर लक्ष्मी खोके आहे आणि सरस्वती डोके आहे", असे पाटील म्हणाले.

सरस्वती ही फक्त हिंदूची देवता नाही. बौद्ध धर्मियांमध्ये मंजुश्री, जैन धर्मियांमध्ये वागेश्वरी नावाने तिची पूजा केली जाते. सिलोन, जपान, जकार्तामध्ये तिची पूजा होते. भारतीय संस्कृतीचा जयघोष केवळ जनसंघाने केला नाही तर समाजवाद्यांनी केला आहे. भारतीय संस्कृती हिमालयासारखी आहे. ती सर्वधर्मीयांची आहे., असेही त्यांनी सांगितले.