
Pune : आठ दिवसात बाजार समितीला दुसरा झटका;देखभाल आकार आणि बिगरशेतसारा प्रकरणात स्थगिती
मार्केट यार्ड - डाळिंब यार्डसाठी कोट्यवधींचा भूखंड कवडीमोल दरात १५ अडत्यांना दिल्याच्या प्रकाराला पणन संचालकांनी स्थगिती दिली होती.
त्यांनतर आता बिगरशेतसारा आणि देखभाल आकार दरवाढीच्या प्रकरणात बाजार समितीच्या आदेशला पणन संचालक विनायक कोकरे यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे आठ दिवसात बाजार समितीला पणन संचालकांनी दुसरा झटका दिला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीने डिसेंबर महिन्यात बाजारातील सर्व भूखंडधारकांना बिगरशेतसारा ५५ हजार रुपये आणि देखभाल आकार ७२० रूपयाहून ५ हजार इतकी वाढ करण्यात आली आहे.
तसेच त्यापुढे प्रतिवर्षी एक हजार रुपयांनी देखभाल दरवाढ करण्यात येणार नोटिसा दिल्या होत्या. या दर वाढीच्या वाढीच्या विरोधात दि पूना मर्चंट चेंबरने राज्याचे पणन संचालक यांच्याकडे अपील दाखल केले होते. बाजार समितीने दिलेल्या आदेशाला पणन संचालकांची स्थगिती दिली आहे.
मर्चंट चेंबरने केलेल्या अपिलात म्हटले होते की, ही वाढ अन्याय कारक असून सात पटीने अधिक आहे. नोटीसच्या अनुषंगाने चर्चेसाठी वेळ मिळावा अशी विनंती देखील बाजार समितीला चेंबरने केली होती.
तरीही कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. अकृषिक कराच्या आकाराच्या वसूलीस पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. तरीही बाजार समिती सक्तीने वसुली करत आहे.
भूखंड धारकांशी चर्चा करून निर्णय घ्यावा
रजिस्टर्ड भाडेपट्ट्यातील "देखभाल खर्चात वाढ करण्याची असल्यास बाजार समिती आणि भूखंड धारकांशी चर्चा करून निर्णय घ्यावा. तसेच देखभाल आकार आणि बिगरशेतसारा मागणीला स्थगिती देणे आवश्यक आहे. असल्याने निर्णयास स्थगिती देत असल्याचे पणन संचालक विनायक कोकरे यांनी घेतलेल्या निर्णय म्हटले आहे.
बाजार समितीच्या कायद्यात सेसच्या उत्पन्नातून सर्व सुविधा देणे आवश्यक आहे. तरीही समितीने व्यापाऱ्यांशी कोणतीही चर्चा न करता दरवाढ केलेली आहे. कोणताही निर्णय घेताना व्यापारी संघटनांशी चर्चा करून निर्णय घ्यायला हवा. या विरोधात दि पूना मर्चंट चेंबरने पणन संचालक यांच्याकडे दाद मागितली होती. त्याला स्थगिती मिळाली आहे.
राजेंद्र बाठीया, अध्यक्ष, दि पूना मर्चंट चेंबर