esakal | नवरा म्हणजे नवरा असतो ; घरकाम केलं तरी नोकर नसतो !
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

नवरा म्हणजे नवरा असतो ; घरकाम केलं तरी नोकर नसतो !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सु. ल. खुटवड (९८८१०९९०९०)

स्नेहलने आपलं तोंड भरून कौतुक करावं, असं योगेशला अनेकदा वाटायचं. त्यामुळे तो भांडी घासणे, लादी पुसणे, कपडे धुणे या कामात मदत करायचा. मात्र, ती त्याचं कधीच कौतुक करायची नाही. मात्र, एकदिवस तरी स्नेहल आपलं कौतुक करील, अशी त्याला आशा होती.

स्नेहलच्या पंधरा मैत्रिणी महिन्यातून एकीच्या घरी जमून किटी पार्टी करत असत. आज स्नेहलचा नंबर असल्याने ती सकाळपासून गडबडीत होती. पावभाजी व पुलावचा बेत तिने आखला होता. योगेशला मदतीला घेऊनच तिची कामे चालली होती. दुपारी दोनपर्यंत स्वयंपाक तयार ठेवायचा, असं तिने ठरवलं होतं. त्यानुसार ती पटापट कामं उरकत होती.

‘‘मी थोडी खरेदी करून अर्धा तासात येते. तोपर्यंत तुम्ही भांडी घासून फरशीही पुसा. माझ्या मैत्रिणींना घर कसं आरशासारखं लख्ख दिसलं पाहिजे,’’ असं सांगून ती घराबाहेर पडली. योगेशने पडत्या फळाची आज्ञा मानत कामाला सुरवात केली. स्नेहल घराबाहेर गेल्यानंतर त्याने टी शर्ट व पॅंट काढून ठेवली कारण बनियन व अंडरवेअरवर त्याला घरकाम करताना मोकळं वाटायचं. शिवाय फरशी पुसताना पॅंट भिजत नसल्यानं त्याला ते फार सोयीचंही होतं. ‘तुझं मन स्वच्छ तर फरशीही स्वच्छ रं. तू पुसत जा रं गड्या तुला भीती कुणाची, परवा कुणाची,’ एका प्रसिद्ध गाण्याची तोडफोड करत योगेश फरशी पुसण्याच्या कामात गुंग झाला. तेवढ्यात दोन-तीन वेळा बेल वाजल्याने तो भानावर आला. दरवाजा उघडल्यानंतर दारात सात-आठ बायका बघून तो भांबावून गेला.

‘‘बाईसाहेब, कोठं बाहेर गेल्यात का रे?’’ आरतीने विचारले.

‘‘हो. हो. येतीलच पाच मिनिटांत’’, असं म्हणून योगेशने त्यांना बसायला सांगितलं. मग त्याने सगळ्या जणींना पाणी दिले व परत तो फरशी पुसायला लागला. ‘‘शी बाई! आमच्यासमोर तू एवढ्या कमी कपड्यांत वावरू नकोस. स्नेहल खपवून घेत असेल. आम्हाला नाही चालणार.’’ प्रज्ञाने त्याला फटकारले. त्यानंतर तो पूर्ण कपडे घालून आला व भांडी घासू लागला.

‘‘स्नेहलचा नवरा बाहेर गेलाय वाटतं? अगं तो नुसता नंदीबैल आहे, असं म्हणतात. वेंधळा आणि गबाळा तर एवढा आहे की काही बोलायची सोय नाही. स्नेहल त्याच्याबरोबर कसा काय संसार करते, कोणास ठाऊक?’’ प्रमिलाने खमंग विषयाला फोडणी दिली. अनुपस्थित असणारीवर यथेच्छ तोंडसुख घ्या, या किटी पार्टीतील पहिल्या नियमानुसार चर्चेस सुरवात झाली. योगेशने ऐकून न ऐकल्यासारखं केलं.

हेही वाचा: पूर तुमचा; पूर आमचा चिखल मात्र सारखाच

‘‘काय रे स्नेहल वेळच्यावेळी तुला पगार देते का? की फुकटच राबवून घेते?’’ स्मिताने योगेशला विचारले.

‘‘मॅडम, कसला आलाय पगार? दोनवेळेचे जेवण आणि कपडेलत्ते मिळतात. सणा-वाराला गोडाधोडाचे जेवण मिळते.’’ योगेशने उत्तर दिले. ‘‘अरे ही तर पिळवणूक झाली. तू माझ्याकडे ये. तुला चांगले पगार देते,’’ प्राचीने म्हटले.

‘‘मॅडम, ते नाही जमणार. आमचा जन्माचा करार झालाय’’, योगेशने उत्तर दिले. ‘‘डोंबलाचा करार. याला वेठबिगारी म्हणतात,’’ प्रज्ञाने म्हटले. ‘‘तुमच्यात वेठबिगारी म्हणत असतील. आमच्यात त्याला लग्न म्हणतात,’’ योगेशने म्हटले. मात्र, तेवढ्यात स्नेहल आल्याने त्याचे बोलणे कोणालाच ऐकू गेले नाही. मग त्यांनी विषय बदलला.

‘‘स्नेहल, तू खरंच नशीबवान आहेस. असला नोकर मिळणं, हल्ली सोपं नाही. किती कष्टाळू आणि प्रामाणिक आहे. फक्त बाई त्याला बनियन आणि अंडरवेअरवर घरात वावरू देऊ नकोस. किती ऑड दिसतं ते,’’ प्रज्ञा म्हणाली. त्यावर स्नेहल चिडून जोरात म्हणाली, ‘‘ए तो माझा नवरा आहे.’’ तिचं बोलणं ऐकून सगळ्याजणी स्नेहलची नजर चुकवत बाहेर पडल्या आणि स्नेहलने योगेशकडे खाऊ की गिळू या नजरेने पाहिले.

loading image
go to top