Coronavirus Vaccination : सीरमच्या आदर पुनावाला यांनी घेतली कोरोनाची लस टोचून

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 16 January 2021

कोरोना महामारीवरील देशव्यापी लसीकरणास आजपासून (ता.१६) देशातील १६ राज्यांत प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान मोदीं यांच्या हस्ते लसीकरणाचा श्रीगणेशा झाला. सर्वात मोठ्या लसीकरणाचा मुंबईतून शुभारंभ झाला.

पुणे : जगातील ही सर्वांत मोठी लसीकरण मोहीम असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्‌घाटन झाले. लसीकरणामध्ये मोलाची भूमिका निभावणाऱ्या पुण्यातील 'सिरम'चे सीईओ आदर पुनावाला यांनी आज लस टोचून घेतली. 

कोरोना महामारीवरील देशव्यापी लसीकरणास आजपासून (ता.१६) देशातील १६ राज्यांत प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान मोदीं यांच्या हस्ते लसीकरणाचा श्रीगणेशा झाला. सर्वात मोठ्या लसीकरणाचा मुंबईतून शुभारंभ झाला. त्यानंतर AIIMS हॉस्पिटलमधील सफाई कर्मचाऱ्याला कोव्हिड 19 ची पहिली लस देण्यात आली. दरम्यान, आदर पुनावाला यांनी 'सीरम'मध्ये निर्माण केलेल्या कोविशिल्ड लसीचा पहिला डोस आज घेतला. 

पहिल्या टप्प्यात दिल्ली व महाराष्ट्रासह १६ राज्यांतील लाखो डॉक्‍टर व आरोग्य सेवकांना लसीकरण करण्यात आले. पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात शनिवारी(ता. 16)सकाळी अकरा वाजल्यापासून सुरुवात झाली. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एकूण आठ लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी शंभर नोंदणीकृत लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. 

देशात सध्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला मंजुरी मिळाली आहे. याशिवाय इतरही काही लसींची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात कोरोना लशीचा पहिला डोस देण्यात आला. त्यानंतर एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलरिया यांनीही लस टोचून घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Serum CEO Adar Poonawalla receives First shot of COVISHIELD vaccine