डॉ. होमी भाभा रुग्णालयाची रुग्णांना प्रतिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Homi Bhabha Hospital

सर्वसामान्य नागरिकांचा आधार, महिलांच्या प्रसुतीसाठी महत्वाचे ठिकाण वडारवाडी येथील डॉ. होमी भाभा हॉस्पिटल २०१८ साली नवीन बांधण्यासाठी जमीनदोस्त करण्यात आले.

Dr Homi Bhabha Hospital : डॉ. होमी भाभा रुग्णालयाची रुग्णांना प्रतिक्षा

शिवाजीनगर - सर्वसामान्य नागरिकांचा आधार, महिलांच्या प्रसुतीसाठी महत्वाचे ठिकाण वडारवाडी येथील डॉ. होमी भाभा हॉस्पिटल २०१८ साली नवीन बांधण्यासाठी जमीनदोस्त करण्यात आले. चार वर्ष होऊन देखील हॉस्पिटलचे बांधकाम अद्याप पूर्ण न झाल्याने महिलांना प्रसुतीसाठी धावपळ करावी लागत आहे.वर्षनिहाय मिळालेल्या निधीतून हे काम सुरू आहे. मात्र काम संथ गतीने होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

महापालिका अधिक्षक अभियंता हर्षदा शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे बांधकाम तात्काळ पूर्ण करण्यासाठी मागणी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी विनायक कोतकर, विशाल पवार, सुनील लोयरे, सुरज कुसाळकर, निखिल डोंगरे, आकाश डोंगरे, तुषार नलावडे, मिलन बोर्डे आदी उपस्थित होते.

गोखलेनगर, जनवाडी, वैद्युवाडी, वडारवाडी, पांडवनगर या परिसरात वस्ती भाग असल्याने इथे सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात राहतात. त्यांच्यासाठी डॉ. होमी भाभा हॉस्पिटल मोठा आधार आहे. बांधकाम तात्काळ पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी द्यावे अशी मागणी या भागातील स्थानिक रहिवाशी करत आहेत.

'महिलांना प्रसुतीसाठी सोय राहिली नाही, निधी उपलब्ध होत नसल्याने बांधकाम संत गतीने होत असल्याचे सांगितले जाते. मात्र जी २० सारख्या उपक्रमांना कोट्यवधी निधी कसा तात्काळ उभा केला जातो. त्याच धर्तीवर शासनाच्या कोणत्याही योजनेतून निधी घेऊन बांधकाम पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी हॉस्पिटल उपलब्ध करून द्यावे. महिलांची होणारी धावपळ थांबवावी अन्यथा महापालिकेच्या दारात भीक मांगो आंदोलन करण्यात येईल.'

- रणजीत शिरोळे, विभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

'प्रशासनाचा ढिसाळ कारभार आहे. कामला वेग पाहिजे होता तेवढा अजिबात नाही. बांधकाम बांधण्याची प्रशासनाची आर्थिक गणितं तयार नव्हती तर पाडायला घाई का केली? प्रसुतीसाठी महिलांना इतरत्र फिरावे लागते.'

- महेंद्र पवार, रहिवाशी वडारवाडी

बजेट मिळेल तसे काम केलं जात आहे. या वर्षी मिळालेल्या बजेटमध्ये मार्च पर्यंत काम होईल. एप्रिल २०२३ पासून पुढील बजेट मिळेल. एप्रिल पासून पुढे सहा महिन्यात काम पूर्ण होईल.

- हर्षदा शिंदे, अधिक्षक अभियंता महापालिका

टॅग्स :puneHospitalPatient