पुणे : शिवाजीनगर स्थानकाचा होणार पुनर्विकास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Shivajinagar station Central Railway redeveloped

पुणे : शिवाजीनगर स्थानकाचा होणार पुनर्विकास

पुणे : शिवाजीनगर रेल्वे स्थानकाचा विकास आता मध्य रेल्वे स्वतः करणार आहे. स्थानकाच्या विकासाची जबाबदारी यापूर्वी आरएलडीए (रेल्वे लँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी) यांच्याकडे दिली होती. मात्र, मागील काही वर्षांत त्यांनी कोणतेच काही काम केले नाही. त्यामुळे रेल्वे बोर्डाने त्यांच्याकडून विकासाचे काम काढून त्याची जबाबदारी आता मध्य रेल्वेला दिली आहे. २०२४ पर्यंत भारतातील बहुतांश स्थानकांचा विकास करण्याची रेल्वेची योजना आहे. यात शिवाजीनगर स्थानकाचाही समावेश आहे. सुमारे दीडशे कोटी रुपयांचा खर्च शिवाजीनगर स्थानकावर केला जाईल. यातून नव्या प्रवासी सुविधा, तसेच स्थानकाचा लुक बदलला जाणार आहे. पुणे व शिवाजीनगर स्थानकाचा पुनर्विकास करण्याचे ठरविले.

पुणे स्थानकाची आयआरएसडीसी (इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) आणि शिवाजीनगरची ‘आरएलडीए’ यांच्याकडे जबाबदारी होती. रेल्वे मंत्रालयाने दोघांना दणका देत त्यांच्याकडून स्थानक विकासाची जबाबदारी काढून घेतली. आता पुणे स्थानकाचा विकास ‘आरएलडीए’ करेल, तर शिवाजीनगर स्थानकाचा विकास मध्य रेल्वे करणार आहे.

स्थानकाच्या विकासाच्या नावाखाली आधीच खूप उशीर झाला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता स्वतःच विकास करण्याचा निर्णय घेतला. आधी मोठे हॉटेल, व्यावसायिक दुकाने आदी स्थानकावर थाटण्याचा विचार होता. मात्र, नव्या निर्णयात स्थानकांवर कुठेही कमर्शिअल वापर होणार नाही, हे ठरविले आहे.

...या सुविधा प्रवाशांना मिळतील

  • स्थानकावर स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडेल अशी त्याची रचना केली जाईल

  • प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी प्रवेश व बाहेर पडण्याचा मार्ग वेगळा असेल

  • प्रत्येक फलाटावर लिफ्ट व सरकता जिना असेल, त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होईल

  • फलाट जास्तीत जास्त प्रमाणात मोकळे राहतील याप्रमाणे रचना

  • स्थानकांवर केटरिंग, स्थानिक वस्तूंचे विक्री केंद्र, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, एटीएम आदी

  • मेट्रो, पीएमपी बसबरोबर इंटिग्रेशन

  • स्थानकाच्या दोन्ही बाजूने प्रवेशद्वार

  • फलाटावर पार्सलची वाहतूक नसेल

  • मोठ्या प्रमाणात पार्किंग

  • स्थानकात ग्रीन बिल्डिंगची संकल्पना साकारली जाईल

शिवाजीनगर स्थानकाचा विकास आता मध्य रेल्वे करणार आहे. त्यासंबंधीचा आदेशदेखील काढण्यात आला. स्थानकाचा विकास झाल्याने प्रवाशांना चांगल्या दर्जाची सुविधा मिळेल. लवकरच या कामास सुरुवात होईल.

- बी. के. सिंह, अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक, पुणे

- प्रसाद कानडे

Web Title: Pune Shivajinagar Station Central Railway Redeveloped

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top