esakal | Pune : शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या कर्ज वसुली अधिका-यास अटक
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक

Pune : शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या कर्ज वसुली अधिका-यास अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतील (Shivajirao Bhosale Co-operative Bank) गैरव्यवहार प्रकरणात गेल्या तीन महिन्यांपासून फरार असलेल्या कर्ज अधीक्षक आणि वसुली अधिका-यास पोलिसांनी अटक केली आहे. हनुमंत संभाजी केमधरे असे या अधिका-याचे नाव आहे. या गुन्ह्यात फरार झाल्याने न्यायालयाने त्याच्या विरोधात अटक वॉरंट देखील जारी केले होते. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उप-आयुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले.

त्या पथकात पोलिस रवींद्र गवारी, शिरीष गावडे यांची नेमणूक करून त्यांच्यावर आरोपीला पकडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. ज्यांनी काही दिवसांपूर्वी बीएचआर गैरव्यवहारातील मुख्य आरोपी जितेंद्र कंडारे व सुनील झंवर यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले होते. केमधरे याला न्यायालयाने १७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सतीश वाळके, महेंद्र जगताप, उप निरीक्षक महेश मते, महिला पोलिस अंमलदार कोमल पडवळ करीत आहेत.

या गुन्ह्यात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आमदार अनिल शिवाजीराव भोसले (वय ५५ रा. बाणेर रस्ता), सूर्याजी पांडुरंग जाधव (वय ६९, रा. कमला नेहरू पार्क), तानाजी दत्तु पडवळ (वय ५०, रा. तापकीरनगर, काळेवाडी), शैलेश संपतराव भोसले (वय ४७ रा. नीलज्योती सोसायटी, गोखलेनगर), पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास विठ्ठल बांदल, हितेन ऊर्फ हितेंद्र विराभार्इ पटेल आणि मनोजकुमार प्राणनाथ अब्रोल यांना अटक केली आहे.

हेही वाचा: केंद्राच्या सुचनेवरुनच राणे कुटुंबियांविरोधात कारवाई - वळसे

कुटुंबातील सदस्यांशी देखील संपर्क साधत नव्हता :

केमधरे याने तो वापरत असलेले सर्व मोबाईल बंद केले होते. तो त्यांच्या कुटुंबातील कोणाशीही संपर्क साधत नव्हता. मात्र गवारी आणि गावडे यांनी आरोपी वापरत असलेल्या टेलिग्राम, व्हॉटस्अप इंस्टाग्राम व सोशल मीडिया या सर्वांचा तांत्रिक तपास करून आरोपीच्या ठाव ठिकाणांबाबत माहिती प्राप्त केली. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, केमधरे हा त्याचा सुगावा लागणार नाही याची पुरेपुर दक्षता घेत आहे. तो त्याचा मित्र रज्जाक मुलाणी यांच्या पुरंदर येथील फार्म हाऊसवर राहण्यास होता, अशी माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार गवारी आणि गावडे हे तेथे पोचले व त्यांनी वेषांतर करून केमधरे याला ताब्यात घेतले.

loading image
go to top