esakal | केंद्राच्या सुचनेवरुनच राणे कुटुंबियांविरोधात 'लुक आउट सर्क्युलर'; गृहमंत्र्यांचा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Dilip Walase Patil

केंद्राच्या सुचनेवरुनच राणे कुटुंबियांविरोधात कारवाई - वळसे

sakal_logo
By
अमित उजागरे

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कुटुंबियांविरोधात पुणे पोलिसांनी काढलेल्या 'लुक आऊट सर्क्युलर' प्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भाष्य केलं आहे. केंद्र सरकारच्या सुचनेनुसार पोलिसांनी ही कारवाई केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

वळसे पाटील म्हणाले, "राणे कुटुंबियांच्या कंपन्यांची DHFL या फायनान्स कंपनीकडे कर्जाची रक्कम थकीत होती. हे प्रकरण केंद्र सरकारपर्यंत पोहोचलं. त्यानंतर यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यासाठी केंद्रानं एक पत्र राज्य सरकारला पाठवलं. त्यामुळे या पत्राला अनुसरुनच पुणे पोलिसांनी नितेश राणे आणि त्यांची आई नीलम राणे यांच्या विरोधात 'लुक आउट सर्क्युलर' काढलं"

हेही वाचा: भ्रष्टाचाराच्या यादीत आणखी एक कॅबिनेट मंत्री- सोमय्या

आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं DHFL कडून २५ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. या कंपनीच्या नीलम नारायण राणे या सहअर्जदार होत्या. तसेच निलम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं ४० कोटी रुपयांचं कर्ज DHFL कडून घेतलं होतं. या दोन्ही कर्जाची परतफेड न केल्यानंतर त्यांच्याविरोधात DHFLनं पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर पुणे पोलिसांना यासंदर्भात ३ सप्टेंबर रोजी लुकाऊट सर्क्युलर जाहीर केलं. पण लुकआऊट सर्क्युलर हे गुन्ह्यासंदर्भात नसून संबंधित थकबाकीदारावर नजर ठेवण्यासाठी असतं.

हेही वाचा: पुणे : विद्यापीठाची ‘एनआयआरएफ रँकिंग’ घसरली

दरम्यान, हे लुकआऊट सर्क्युलर पुणे पोलिसांकडून छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाकडं पाठवलं आहे. कर्ज बुडवून राणे कुटुंबीय भारताबाहेर जाऊ शकतात अशी भीती DHFLला असल्यानं त्यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली होती. त्यानंतर तक्रारीवरुन पोलिसांनी हे सर्क्युलर जाहीर केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

फोन टॅपिंगप्रकरणाचा रिपोर्ट आठवड्याभरात - गृहमंत्री

राज्यातील फोन टॅपिंगप्रकरणाच्या चौकशीसाठी उच्च स्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचा अहवाल येत्या आठवड्याभरात येणं अपेक्षित आहे. हा अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असंही यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितलं.

loading image
go to top