पुण्यातील शिवसैनिकांनी केवळ सतरंज्या उचलायच्या का?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

शिवसेनेला एकही मतदारसंघ न मिळाल्याने पुण्यातील शिवसैनिकांना केवळ भाजपच्या सतरंज्या उचलायची वेळ आली आहे.

पुणे : शिवसेनेला एकही मतदारसंघ न मिळाल्याने पुण्यातील शिवसैनिकांना केवळ भाजपच्या सतरंज्या उचलायची वेळ आली आहे. यामुळेच आता जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी बंडखोरी करत थेट खडकवासल्यातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार आहे

खडकवासला मतदारसंघ शिवसेनेसाठी घ्यावा यासाठी कोंडे यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे साकडे घातले होते. भाजपच्या नेत्यांचे मन वळविण्यासाठी त्यांच्याही गाठीभेटी घेतल्या. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसैनिकांनी इमानेइतबारे काम केले.

विधानसभेसाठी भाजप शिवसेना युती झाल्यावर पुण्यातून शिवसेनेला एक दोन जागा सुटतील, त्यात हडपसर आणि खडकवासला या दोन मतदारसंघाची चर्चा होती. कोंडे यांनी त्यासाठी प्रयत्न चालवले होते. गेले काही दिवस ते मुंबई नेत्यांच्या संपर्कात होते. पण लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात या मतदारसंघाने भाजपला 70 हजाराचे मताधिक्य दिल्याने एवढा सुरक्षित मतदारसंघ सोडण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपने खडकवासल्यातून पुन्हा एकदा आमदार भीमराव तापकीर यांनी उमेदवारी देऊन या मतदारसंघाचा ताबा स्वतःकडेच ठेवला.

दरम्यान, शिवसेनेला मतदारसंघ सुटत नसल्याने कोंडे हे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू होती. त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यात एकमत झाल्याने गुरूवारी (ता. 3) उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सोशल मीडियावरून तसा प्रचार ही सुरू झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune shivsena district head ramesh konde Decision to contest the vidhansabha election