esakal | पुणे : सोसायटीने कचरा जिरवलाच पाहिजे
sakal

बोलून बातमी शोधा

Garbage

पुणे : सोसायटीने कचरा जिरवलाच पाहिजे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरात कचऱ्याचे (Garbage) प्रमाण वाढत असताना महापालिकेला (Municipal) यावर मोठा खर्च (Expenditure) करावा लागत आहे. सोसायट्यांनी (Society) त्यांचा कचरा त्यांच्याच आवारात जिरवला पाहिजे; पण त्यासाठी महापालिकेकडून योग्य मार्गदर्शन मिळाले पाहिजे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

‘सकाळ’ने ‘मिळकतकर सवलत घेताय, ओला कचरा सोसायटीतच जिरवा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यावर नागरिकांना त्यांच्या प्रतिक्रिया कळविण्याचे आवाहन केले होते. त्यास अनेकांनी प्रतिसाद दिला. यापैकी काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया.

प्रत्येक सोसायटीने स्वतःचा कचरा सोसायटीच जिरवला पाहिजे. आमच्या सोसायटीमध्ये पाच वर्षापूर्वी ही संकल्पना मांडली होती; परंतु त्यास प्रतिसाद दिला नाही. जर आम्हाला मार्गदर्शन केले, जनजागृती केली तर सोसायटीतील कचरा प्रकल्प सुरू होऊ शकेल.

- विशाल सिंगवी, कलम सुंदर सोसायटी, सुखसागरनगर

सोसायटीने कचरा प्रकल्प सुरू केल्यास मिळकतकरात सूट मिळून पैशांची बचत होऊ शकते. तसेच नागरिकांना ओला- सुका कचरा वेगळा करण्याची सवय लागेल. महापालिकेचा वाहतूक खर्च कमी होऊन त्याचाही ताण कमी होईल. यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा.

- सचिन जाधव

आमच्या सोसायटीत ओला-सुका कचरा जिरवला जातो. पण यासाठी योग्य मार्गदर्शन व साहित्य योग्य दरात उपलब्ध झाले पाहिजे. त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चाचा बोजा वाढणार नाही. तसेच कचरा प्रकल्प केला म्हणजे सवलत मिळतेच असे नाही, ते आमच्या मिळकतकराच्या बिलावरून लक्षात येत आहे. याकडे लक्ष द्यावे.

- राजेंद्र चुत्तर

शहरीकरणात कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर होत असताना सोसायटीने कचरा जिरविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. कचरा व्यवस्थापनासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा स्वीकार करायला हवा.

- धोंडपा नंदे, वानवडी

अध्यक्षांच्या वादामुळे प्रकल्प बंद

सिंहगड रस्ता भागातील एक वाचकाने नाव न छापण्याच्या अटीवर सोसायटीची अडचण सांगितली. सनसिटी रस्त्यावर ८७ फ्लॅट व १० दुकाने असलेली ही सोसायटी असून, येथे कचरा प्रकल्प होता. पण सोसायटीच्या अध्यक्षांच्या वादात हा प्रकल्प बंद पडला, अशी कैफियत त्यांनी मांडली.

loading image
go to top