Pune : पुणे सोलापूर महामार्गावर तळे : वाहनांच्या रांगा आणि कसरत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

Pune : पुणे सोलापूर महामार्गावर तळे : वाहनांच्या रांगा आणि कसरत

मांजरी : काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मांजरी परिसरातील पुणे-सोलापूर महामार्गावर लक्ष्मीकॉलनी ते स्टडफार्म या अंतरात मोठ्याप्रमाणात पाणी साठले आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठ्याप्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे. या पाण्यातून वाहनांना एका रांगेतून प्रवास करावा लागत असल्याने सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची रांग लागून सुमारे अडीच किलोमीटर पर्यंत वाहतूककोंडी झाली आहे. यातून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली.

महामार्गावर या ठिकाणी सखल भाग असल्याने दोन्हीही बाजूला मोठ्याप्रमाणात पाणी साठले आहे. महामार्गावरील या परिस्थितीमुळे शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, कामगार यांच्या इच्छित स्थळी पोहचण्याच्या वेळा चुकल्या. आज दिवसभर वाहनांना या पाण्यातून प्रवास करावा लागला. त्यामुळे महामार्गावरील या ठिकाणच्या वाहतुकीचा वेग मंदावला आहे. पुढे विभागीय बाजार समितीजवळही बाजारासाठी आलेल्या वाहनांमुळे गर्दी होऊन वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

महामार्गावरील हे पाणी मध्यरात्री शेजारील व्यवसायिकांच्या शेडमध्ये शिरून मोठे नुकसान झाले आहे. मुर्तीकार कुटुंबांना आपला संसार सोडून अंगावरील भिजलेल्या कपड्यांत रस्त्यावर उभे राहून रात्र काढावी लागली

दरम्यान वाहतूक पोलिसांनी आज सकाळपासून येथे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पुण्याकडून जाणाऱ्या वाहतूक मार्गावरील चेंबर तोडून पाणी काढून दिले आहे. मात्र, शहरात येणाऱ्या मार्गावरील पाण्याचा निचरा अद्यापही होऊ शकला नाही. त्यामुळे वाहतूक नियंत्रणात अडचण येत असल्याचे वाहतूक पोलीस उपनिरीक्षक महादेव देसाई यांनी सांगितले.

"येथे सखल भाग असल्याने व शेजारील जमिनीतील पाण्याची पातळी वाढून रस्त्यावर आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळी वाहिनी जेसीबी यंत्राच्या साह्याने तोडून पाण्याचा निचरा करण्यात येत आहे. सायंकाळ पर्यंत पाण्याचा निचरा होऊन वाहतूक सुरळीत होईल.'

प्रसाद काटकर

सहाय्यक आयुक्त, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय