Pune : अखेर सोलापूर महामार्गावरील पाण्याचा होऊ लागला निचरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Road

Pune : अखेर सोलापूर महामार्गावरील पाण्याचा होऊ लागला निचरा

मांजरी : येथील पुणे-सोलापूर महामर्गावर साचलेल्या पाण्याला अखेर रस्ता तोडून वाहिन्या टाकाव्या लागल्या आहेत. त्यामुळे महामार्गावर साचलेले पाणी काही प्रमाणात काढून देण्यात प्रशासनाला यश आले आहे. काल (ता. २०) मध्यरात्री सोलापूरकडे जाणारा मार्गाचे खोदकाम करून वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. तर आज रात्रीही शहरात येणाऱ्या मार्गावर हे काम करण्यात येणार आहे.

गेली चार दिवसांपासून महामार्गावर मोठ्याप्रमाणात पावसाचे पाणी साठून राहिले आहे. पालिकेकडून उपाययोजना करूनही पाणी कमी होत नव्हते. त्यामुळे या परिसरात मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांच्यासह काही नागरिक व अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबत तक्रार केली होती. त्यांच्या आदेशाने महानगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार याठिकाणी चोवीस इंची दोन वाहिन्या व तीन चेंबर टाकून पाण्याला वाट काढून देण्यात आली आहे. मात्र, एवढे करूनही शहरात येणाऱ्या मार्गावरील पाणी कमी न झाल्याने आज रात्री या मार्गावरही खोदकाम करून वाहिन्या टाकण्यात येणार आहे.

दरम्यान, काल शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सरचिटणीस विक्रम शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली थेट पाण्यात बसून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले होते. आज (ता. २१) आमदार चेतन तुपे, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश घुले यांनी कार्यकर्त्यांसह येऊन कामामुळे झालेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. आज दिवसभरही येथे वाहतूक संथगतीने होत असल्याने प्रवाशांना कोंडीशी सामना करावा लागला.

माजी आमदार जगन्नाथ शेवाळे म्हणाले, "महामार्ग प्राधिकरणने पुणे सोलापूर महामार्गाचे बांधकाम करताना येथील नैसर्गिक ओढेनाले थेट बंद करून टाकले आहेत. वास्तविक अशा दोनतीन ठिकाणी मोऱ्या टाकणे आवश्यक होते. मात्र, तसे न केल्याने यामार्गे येणाऱ्या पाण्याचा निचरा होत नाही. पावसाळी वाहिनीतूनही ते जात नाही. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या केलेली उपाययोजना तकलादूच ठरणार आहे.'

"याठिकाणी स्वतंत्र वाहिनी टाकल्याने येथे साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. कालच रात्री हे संपूर्ण काम होणे अपेक्षित होते. मात्र, पाण्यात करावे लागणारे काम आणि पाहटे वाढलेली वाहतूक यामुळे तीन पाहटे वाजता काम बंद करावे लागले. आज मध्यरात्री राहिलेल्या एका बाजूचे काम करण्यात येणार आहे.'

प्रसाद काटकर सहाय्यक आयुक्त, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय