esakal | पुण्यातील विद्यार्थ्यांची गगनभरारी; अवकाशातील मानवी वस्तीच्या प्रकल्पाला 3रा क्रमांक

बोलून बातमी शोधा

pune

जगभरातील विद्यार्थ्यांसाठी अंतराळातील वस्तीसाठी शास्त्रीय संकल्पना मांडण्याची स्पर्धा घेण्यात आली होती.

पुण्यातील विद्यार्थ्यांची गगनभरारी; अवकाशातील मानवी वस्तीच्या प्रकल्पाला 3रा क्रमांक
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : अंतराळातील मानवी वस्तीच्या संकल्पना अनेक चित्रपटांतून, कथा कादंबऱ्यांतून मांडण्यात येतात. पण त्याला वास्तवतेचा किंवा विज्ञानाचा कोणताच कोणताच आधार नसतो. भविष्यात निश्चितच मानवी वस्तीची उभारणी अंतराळात किंवा परग्रहावर करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील नॅशनल सोसायटीच्या (एनएसएस) वतीने जगभरातील विद्यार्थ्यांसाठी अंतराळातील वस्तीसाठी शास्त्रीय संकल्पना मांडण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात पुण्यातील डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. 

हेही वाचा - पुण्यात विमाननगरातील खुनाचं उकललं गूढ; पूर्वीच्या वादावरुन तरुणाचा झाला खून

विद्यालयात नववीच्या इयत्तेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी ‘नावीस’ नावाची संकल्पना मांडली आहे. यात विज्ञानाचा आधार घेऊन अंतराळात मानवी वस्ती कशी उभारता येईल, तीला लागणाऱ्या मूलभूत गरजा कशा भागवता येतील, या संबंधीची सविस्तर माहिती या संकल्पनेत मांडण्यात आली आहे. विशेष म्हणजे यासाठी ७० पानांचा एक अहवाल एनएसएसच्या शास्त्रज्ञांकडे सुपूर्त करण्यात आला आहे. भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम’ विचारदृष्टीच्या आधारे आधुनिक भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राच्या मूलभूत संकल्पनांच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. 

सहभागी विद्यार्थी... 
विहंग विद्वांस, मानस विचारे, सिमरण वर्मा, अन्वय सिन्कर, पार्थ सांगळे, ऋग्वेद रांजणीकर, अवनीश बापट, आर्या देशपांडे, सुधन्वा राजूरकर, सिद्धांत पाई या विद्यार्थ्यांना पल्लवी अय्यर आणि परेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. 

हेही वाचा - पुण्यात मास्कची शिस्त मोडणाऱ्या नागरिकांकडून तब्बल २८ कोटींचा दंड वसूल

काय आहे ‘नावीस’ प्रकल्प? 
अंतराळातील वस्तीसाठी ‘कोणताच देश मागे राहणार नाही’ या ध्येयाने प्रेरित हा नावीस प्रकल्प मांडण्यात आला आहे. या वस्तीत अंतराळवीर, संशोधक आणि प्रवासी असे तीन प्रकारातील लोक असतील. वस्तीसाठी चार टप्पे निश्चित करण्यात आले आहे. प्रारंभ या टप्प्यात ४५० लोकांना वसविण्यात येणार, त्यानंतर ‘मध्यमा’ या टप्प्यात ३९६ लोकांना, ‘अभिवृद्धी’ या टप्प्यात पुन्हा ३९६ लोकांना आणि शेवटच्या संपूर्ण या टप्प्यात ३९६ लोकांना अंतराळातील वस्तीत वसविण्यात येईल. अंतराळातील वस्तीसाठी आवश्यक गुरुत्वाकर्षण, अन्न, पाणी आणि शुद्ध हवा कशी मिळवायची याचे प्रयोजनही या प्रकल्पात करण्यात आले आहे. 
 
विद्यार्थ्यांची खगोलशास्त्रातील रुची 
बरोबरच त्यांची कल्पनाशक्तीचा विस्तार यातून वृद्धींगत होतो. फक्त परिक्षेसाठी नाही तर स्वतःच्या क्षमताविकासासाठी शिक्षण असल्याची जाणीव त्यांना यातून झाली आहे. एकमेकांसोबत एक संघ म्हणून कसे काम करायला पाहिजे याची शिकवणही या प्रकल्पाच्या निमित्ताने मिळाली आहे. 
- पल्लवी नाईक, मुख्याध्यापिका, डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल 

आकडे बोलतात.. 
स्पर्धेत सहभागी देश : २२ 
सहभागी संघ : १,६१९ 
सहभागी विद्यार्थी : ६,८६२ 
नावीसच्या मांडणीसाठी लागलेला वेळ : ११ महिने