

पुणे, ता. १३ : उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाल्याने पुण्यातील बच्चेकंपनी विविध उन्हाळी शिबिरांमध्ये रमताना दिसत आहे. नाटक, नृत्य, चित्रकला, नवीन वाद्य शिकणे अशा कलांमध्ये मुले रममाण झाली आहेत. दिवसेंदिवस या शिबिरांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने ‘शिबिरे झाली उदंड’ असे चित्र सर्वत्र आहे. उन्हाच्या चटक्यांचा काहीसा परिणामही शिबिरांवर झाला आहे.
शहरातील प्रत्येक भागात, प्रमुख उपनगरांमध्ये आणि अगदी गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारातही या उन्हाळी शिबिरांचे आयोजन केले जात आहे. घरापासून जवळ पडत असल्याने आपापल्या भागातील शिबिरांना, तसेच सोसायटीतील शिबिरांना पालक अधिक पसंती देत आहेत.
या शिबिरांमध्ये प्रामुख्याने व्यक्तिमत्त्व विकास, नाट्य, नृत्य, चित्रकला, संगीत आणि विविध वाद्ये वाजविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या शिबिरांकडे पालकांचा कल आहे. मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ कमी करून त्यांच्यातील सुप्त गुणांना चालना देण्यासाठी ही शिबिरे एक उत्तम पर्याय ठरत आहेत.
शिबिरांना सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असला तरी, सध्या पुण्यात जाणवत असलेल्या कडक उन्हाळ्याचा आणि वाढत्या तापमानाचा काहीसा परिणाम यावर झाला आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे आरोग्याच्या काळजीपोटी अनेक पालकांनी अगदी लहान मुलांना घराबाहेर पाठवणे टाळले आहे. त्यामुळे या शिबिरांमधील विशेषतः छोट्या मुलांच्या सहभागाची संख्या काहीशी कमी झाल्याचे संयोजकांकडून सांगण्यात येत आहे.
शिबिरांमध्ये सेलिब्रेटींचे आकर्षण
नृत्य, नाटक या विषयातील शिबिरांमध्ये संयोजकांकडून सेलिब्रेटी मार्गदर्शकांची प्रामुख्याने जाहिरात केली जात आहे. प्रसिद्ध अभिनेते-अभिनेत्री किंवा नृत्यांगना मार्गदर्शन करणार असल्यास आपसूकच त्या शिबिराला मिळणारा प्रतिसाद वाढतो. त्यानुसार या शिबिरांचे शुल्कही वाढवले जाते.
आमच्या नाट्य शिबिरांचे हे ४८वे वर्ष आहे. आजही प्रत्येक सुट्टीत तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. शिबिरांची संख्या वाढली असली तरी पालक प्रशिक्षण देणाऱ्या तज्ज्ञांची गुणवत्ता पाहून आणि अनुभव पाहूनच शिबिराची निवड करतात. यंदा नऊ ते सोळा या मोठ्या गटातील मुलांचा प्रतिसाद नेहमीसारखाच असला तरी पाच ते आठ या लहान गटातील मुलांची संख्या काहीशी रोडावली आहे.
- प्रकाश पारखी, ज्येष्ठ नाट्य प्रशिक्षक, नाट्यसंस्कार कला अकादमी
आमच्या सोसायटीत साधारण २५ ते ३० लहान मुले आहेत. त्यांच्यासाठी सोसायटीतील सभागृहातच व्यक्तिमत्त्व विकास शिबिर आयोजित केले आहे. उन्हात मुलांना बाहेर पाठवावे लागत नसल्याने पालकांसाठी हे सोयीचे ठरले.
- मनिषा कोठावदे, शिबिर संयोजक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.